Job Fraud Pudhari
सांगली

Sangli Job Fraud : नोकरीच्या आमिषाने 5 लाखांचा गंडा

मुंबईच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

शिराळा : सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची तब्बल 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाडीभागाई (ता. शिराळा) येथील मूळ रहिवासी असलेल्या व सध्या नवी मुंबईत राहणाऱ्या सुनील विठ्ठल कांबळे (वाडकर) याच्याविरोधात शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित सुनील कांबळे हा बृहन्मुंबई महापालिकेचा सेवानिवृत्त कर्मचारी आहे. आपल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तो सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवायचा. त्याने गावातील आयटीआय पूर्ण केलेल्या एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन 20 लाख रुपयांची मागणी केली होती. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडित तरुणाने पहिल्या हप्त्यापोटी 5 लाख रुपये दिले, तर उर्वरित रक्कम नोकरी लागल्यानंतर देण्याचे ठरले होते. जानेवारी 2025 ते 2026 या कालावधीत हा पैशाचा व्यवहार झाला.

पण दीर्घकाळ उलटूनही नोकरी न मिळाल्याने तरुणाने वारंवार विचारणा केली. पण, कांबळे याने उडवाउडवीची उत्तरे देत वेळकाढूपणा केला. पैशासाठी सतत तगादा लावल्यानंतर त्याने तरुणाला धनादेश दिला; मात्र तो बँकेत वठला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने दिलेली रक्कम परत मागितली. त्यावेळी कांबळे याने पीडित तरुणालाच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात अन्य काहीजणांचीही फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT