जत : उमदी (ता. जत) येथे मंगळवेढा रस्त्यावर शेवाळेनगर परिसरात मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू झाला. याप्रकरणी उमदी पोलिसांनी मालवाहू पिकअप चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अशोक नीलू चव्हाण (वय ४५) व त्यांची पत्नी सखुबाई अशोक चव्हाण (४६, रा. ड्याबेरी तांडा, ता. विजयपूर) अशी मृतांची नावे आहेत.
अशोक चव्हाण व त्यांची पत्नी सखुबाई हे लोणंद (जि. सोलापूर) येथे विहिरीच्या कामानिमित्त गेले होते. काम पूर्ण झाल्यानंतर ते गावाकडे परतत होते. घरातील कौटुंबिक साहित्य त्यांनी एका मालवाहू पिकअपमधून (केए २८ एए ४१४७) पाठवले होते, तर चव्हाण दाम्पत्य स्वतः दुचाकीवरून (केए ०२ जेएन ९३९७) प्रवास करत होते.
मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास उमदी हद्दीतील शेवाळेनगर येथे समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशझोतामुळे पिकअपचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पिकअपने समोर चाललेल्या चव्हाण यांच्या दुचाकीस मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातात सखुबाई (शकुंतला) चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या अशोक चव्हाण यांना तातडीने उपचारासाठी विजयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना दुपारी त्यांचाही मृत्यू झाला. याबाबत आकाश काशिनाथ चव्हाण (वय २१) यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, पिकअपचालक चांगदेव नानू चव्हाण याने वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकीस धडक दिली.