तासगाव : वायफळे (ता. तासगाव) येथील सागर सदाशिव पाटील या युवकावर पूर्ववैमनस्यातून कोयत्याने खुनीहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सागर याचे वडील सदाशिव हेही जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांनी गाव बंद ठेवून घटनेचा निषेध केला.
या हल्लाप्रकरणी संदेश शैलेश कांबळे व संजीत अजित सावंत (दोघेही रा. वायफळे, ता. तासगाव) यांना अटक केली आहे. वायफळे येथील सागर पाटील व संदेश कांबळे यांच्यात मंगळवारी वायफळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या चौकात किरकोळ कारणावरुन वाद, शिवीगाळीचा प्रकार घडला होता. पोलिसांनी तो मिटवलेला होता. या प्रकारानंतर मंगळवारी रात्री संदेश हा सागर पाटील व इतरांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेला होता. पोलिसांनी चौकशी करुन गुन्हा दाखल करू, अशी भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसात अर्ज देऊन संदेश गावाकडे परतला होता. बुधवारी संशयित संदेश व काहीजण सागर पाटील व इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुन्हा पोलिस ठाण्यात आले, मात्र गावातील प्रमुखांनी शिष्टाईचा प्रयत्न केला. संदेश गुन्हा दाखल करण्यावर ठाम होता. मात्र अधिक चर्चा करून कोणीही गुन्हे दाखल न करता वाद मिटवण्याचे ठरले. पोलिस ठाण्यात येऊन यापुढे कोणीही वाद करणार नाही, अशी नोटरी करण्याचे ठरले.
मात्र गुरुवारी सकाळी संदेश व त्याचा साथीदार संजीत कांबळे तलवार, कोयता घेऊन सागर पाटील याच्या घरी तळेवस्ती येथे मळ्यात गेले. त्यांनी घरात घुसून सागर याच्यावर तलवार व कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून सागर घराबाहेर आला. पण संदेश व संजीत यांनी पाठलाग करून सागरवर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याचा वार चुकवताना तो सागरच्या हातावर लागला. यावेळी वडील सदाशिव हे सागरला वाचवण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही मारहाण केली. यावेळी सागरने आरडाओरडा केला. वस्तीवरील लोक, महिला मदतीसाठी धावत आल्या. त्यामुळे संदेश व संजीत दुचाकी तिथेच टाकून पळून गेले. त्यानंतर तळेवस्ती या मळ्यातील ग्रामस्थांनी दोघांचा पाठलाग केला. मात्र तलवार व कोयता तिथेच टाकून दोघांनी पलायन केले. पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली.