लग्नाच्या नावाखाली फसवणूक (Pudhari File Photo)
सांगली

Fake Marriage Scam: लग्नाच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; आटपाडीतील ‌‘त्या‌’ नवविवाहितेस अटक

1.41 लाखांचा ऐवज लंपास; 7 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी ः आटपाडी तालुक्यात लग्नाच्या आमिषाने विश्वास संपादन करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नवविवाहित महिलेने एजंटाच्या मदतीने पलायन करत लाखोंचा ऐवज लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित नवविवाहिता वर्षा संभाजी शेवाळे (रा. विजयनगर, कराड, जि. सातारा) हिला अटक करण्यात आली असून एजंट सचिन हणमंत बाबर (रा. देवापूर, ता. माण, जि. सातारा) हा अद्याप फरार आहे.

ही घटना 20 ते 25 मार्च 2026 या कालावधीत घडली. संशयितांनी संगनमताने कट रचून वर्षा हिने फिर्यादीशी लग्न केले आणि त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिने दागिने, मोबाईल, कपडे आणि 21 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 41 हजार 415 रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले. याशिवाय, फिर्यादीच्या घरातून सुमारे 2 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कमही चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.

लग्नाच्या आमिषाने आर्थिक फसवणूक करण्याचा संशयितांचा हेतू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी वर्षा शेवाळे या महिलेस अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला 7 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेप्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम 318(4), 316(2), 305 (अ), 3(5) अन्वये गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलिस करत आहेत. फरारी सचिन बाबर याचा शोध सुरू आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT