सांगली

सांगली : जिल्ह्यात पडला ६६ जणांचा ‘मुडदा’!

दिनेश चोरगे

सांगली : सांगली, मिरजेसह जिल्ह्यात यंदाच्या वर्षभरात 66 जणांचा 'मुडदा' पडला. 122 हून अधिक जणांचा 'हाफ मर्डर' झाला. यातून दोन हजारहून अधिक गुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी दहा खुनाच्या घटना अधिक घडल्या. दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व बलात्कार या गुन्ह्यांच्या आलेखात घट झाली आहे. अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिस यंत्रणेला यश आले आहे.

अनैतिक संबंध, आर्थिक वाद, प्रेमसंबंध, गुप्तधनाचे आमिष, कौटुंबिक वाद, चारित्र्याचा संशय, टोळीयुद्ध, शेतीचा वाद, पूर्ववैमनस्य ही खुनामागची प्रमुख कारणे आहेत. गुन्हेगारांशी अप्रत्यक्ष संधान साखून राजकीय वर्चस्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न अनेकजणांकडून केला जात आहे, हे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. या गुन्हेगारांना अपवाद वगळता राजकीय पाठबळ मिळत असल्याने आता ते सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. राजकीय दबावतंत्रामुळे पोलिसी कारवाईतून सहिसलामत सुटता येते, असा समज करून घेऊन हे गुन्हेगार कोणतेही कृत्य करताना कशाचीही तमा बाळगत नाहीत. परिणामी त्यांची दहशत निर्माण होत आहे. गतवर्षी 56 जणांचा 'मुडदा' पडला. सांगलीत टोळीयुद्धातून सहाजणांचा 'मुडदा' पडला. विशेषत: पिस्तूलमधून गोळ्या झाडून 'मुडदा' पाडण्याची नवी पद्धत वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला याचा धडाधड गोळ्या झाडून खून केला. गोकुळनगरमध्ये एकाचा दगडाने ठेचून खून झाला. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत खुनाच्या घटना अधिक घडल्या. 122 जणांवर जीवघेणा हल्ला झाला. खून, खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यांतील हल्लेखोरांना अटक करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. अनेक हल्लेखोर जामिनावर बाहेर आले आहेत.

चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात अपयश

घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, बलात्कार व विनयभंग या गुन्ह्यांच्या आलेखात गतवर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. खून व दरोड्याचे सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात यंत्रणा अपयशी ठरत आहे. रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवरील दरोड्याचा तब्बल सहा महिन्यांपासून तपास सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT