सांगली; पुढारी वृत्तसेवा : आर्थिक देवघेवीच्या वादातून खुनी हल्ला झालेल्या राजेंद्र ऊर्फ अण्णा रामचंद्रा नाईक (37, रा. जुना कुपवाड रस्ता, शिंदे मळा) या चहा विक्रेत्याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
विश्वास ऊर्फ गबर्या नामदेव माने (वय 31, रा. रामरहिम कॉलनी) व करण विजय परदेशी (19, जगदाळे प्लॉट, संजयनगर, सांगली) या दोघांना अटक केली आहे. गबर्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध दोन खून, खुनाचा प्रयत्न, असे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत.
राजेंद्र याची संजयनगरमध्ये चहाची टपरी आहे. गतवर्षी त्याने गबर्याकडून 15 हजार रुपये उसने घेतले होते. या पैशाची त्याला वेळेत परतफेड करता आली नाही. काही दिवसांपासून गबर्याने पैशासाठी त्याच्याकडे तगादा लावला होता. नाईक हा पैसे तुला देईन, असे सांगत असे. मात्र, प्रत्यक्षात तो पैसे देत नव्हता.
सोमवारी दुपारी गबर्या व करण परदेशी त्याच्या घरी गेले. तुझ्याकडे काम आहे, असे सांगून त्याला घरापासून काही अंतरावरील एका मोकळ्या मैदानात नेले. तिथे त्यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली. यातून त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर गबर्याने कंबरेला लावलेली धारदार आकडी काढून हल्ला केला. यामध्ये नाईक गंभीर जखमी झाला. घटनेनंतर गबर्या व परदेशी यांनी पलायन केले.
मंगळवारी दुपारी दोघांना अटक केली होती. त्यांच्याविरूद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. नाईकवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी त्याचा मृत्यू झाला.
नाईक याचा खून झाल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात हलविला. पोलिसांनी या प्रकरणार पुरावे नष्ट केल्याचा आरोप करून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रचंड तणाव होता. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती दिल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेतला.