कुपवाड : कुपवाड येथील अहिल्यानगर (प्रकाशनगर गल्ली नंबर एक) परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख १ लाख १० हजार रूपये आणि १ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, असा एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सागर चंद्रकांत म्हारनूर हे अहिल्यानगर येथील सुरेश यादव यांच्या खोलीत भाड्याने राहतात. ते खोलीला कुलूप लावून शुक्रवारी, २६ जून रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कुटुंबासह नातेवाईकांना भेटण्यासाठी मणदूर (चांदोली) येथे गेले होते. शनिवारी, २७ जूनरोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले. यावेळी त्यांना खोलीचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, घरातील लोखंडी तिजोरीचे लॉकही तोडल्याचे दिसून आले.
चोरट्यांनी तिजोरीतील १ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम, १ लाख २५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स असा २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याचे दिसून आले.