जत : संख (ता. जत) येथे रविवारी मध्यरात्री महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. संतोष शिवाप्पा बिरादार (वय 42) असे मृताचे नाव आहे. घराच्या व्हरांड्यात झोपलेल्या बिरादार यांच्या छातीवर जवळून दोन गोळ्या झाडण्यात आल्या. उमदी पोलिसांनी तीन तासांत दोन संशयितांना जेरबंद केले.
महांतेश मल्लय्या स्वामी (35, रा. दरीबडची) व रोहित ऊर्फ नागेश बाळू जगदाळे (22, सध्या रा. जाडरबोबलाद) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी श्रवंती संतोष बिरादार (16) हिने उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संतोष बिरादार हे महावितरणमध्ये लिपिक पदावर कार्यरत होते. त्यांनी संखजवळील पांडोझरीच्या हद्दीत शेतजमीन खरेदी करून घर बांधले होते. रविवारी रात्री 12.30 ते 1 च्या सुमारास संतोष बिरादार आपल्या कुटुंबासह घराच्या व्हरांड्यात झोपले होते. यावेळी संशयितांनी पिस्तूलमधून त्यांच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या. यात बिरादार यांचा जागीच मृत्यू झाला. बिरादार रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले.
संशयित रोहित ऊर्फ नागेश जगदाळे हा संख ते दरीबडची रस्त्यावर असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक कांबळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बंडू साळवे आणि सिद्धेश्वर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके रवाना करण्यात आली. पोलिसांनी रोहित जगदाळेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाच्या गुन्ह्यात महांतेश स्वामी याचाही सहभाग असल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ जाडरबोबलाद ते माडग्याळ रस्त्यावरील शेतात छापा टाकून महांतेशलाही ताब्यात घेतले.
या प्रकरणातील अटकेत असलेले संशयित महांतेश स्वामी आणि रोहित जगदाळे यांनी खुनाची कबुली दिली आहे. त्यांचा संतोष यांच्याशी पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद होता. तसेच बिरादार यांच्या घरासमोर त्यांनी शेड मारले होत. त्यावरूनही त्यांच्यात भांडणे झाली होती, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी दिली.