विठलापूरमध्ये हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त  
सांगली

Sangli Crime : विठलापूरमध्ये हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

पोलिसांचा छापा पडताच संशयित पसार, ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : विठलापूर (ता. आटपाडी) परिसरात सुरू असलेल्या बेकायदा हातभट्टीवर आटपाडी पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली. अवैध दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त केला. ओढ्याच्या काठावर सुरू असलेल्या या कारवाईत पोलिसांनी ३७ हजार २०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच मुख्य संशयित धनाजी तानाजी मंडले हा घटनास्थळावरून पसार झाला.

विठलापूर-आवळाई मार्गावरील ओढ्याच्या काठावर मोठ्या प्रमाणात हातभट्टीद्वारे बेकायदेशीर दारू निर्मिती सुरू असल्याची माहिती आटपाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून घटनास्थळी छापा टाकला. या छाप्यादरम्यान धनाजी मंडले हा दारू तयार करतानाच आढळून आला; मात्र पोलिसांचे पथक पाहताच त्याने घटनास्थळावरून धूम ठोकली.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी ८०० लिटर कच्चे रसायन, २०० लिटर जळके रसायन, प्लास्टिक व पत्र्याचे बॅरल, खापराची मडकी, भांडी, स्टीलच्या कळश्या, रबरी पाईप तसेच सरपणाची लाकडे असा मोठा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी ही संपूर्ण हातभट्टी जागीच नष्ट करत दारू निर्मितीचे सर्व साहित्य ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी धनाजी तानाजी मंडले याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तैनात केले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलिस निरीक्षक विनय बहिर यांच्यासह उमर फकीर, टार्फे, सचिन पाटील आणि कदम यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT