Fire Pudhari
सांगली

Sangli Crime : मालमत्तेच्या वादातून नातजावयाने वृद्ध आजीला जिवंत जाळले, चोरीचा केलेला बनाव; सांगली पोलिसांकडून गुन्ह्याचा उलगडा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शेटफळे (ता. आटपाडी) येथील ८३ वर्षीय मालन मारुती जाधव यांच्या खूनप्रकरणाचा सांगली पोलिसांनी उलगडा केला. जबरी चोरीत त्यांचा मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्र, मालमत्तेच्या वाटणीच्या वादातून सख्ख्या नातजावयानेच त्यांना जिवंत पेटवून ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी राजेश दिलीप गायकवाड (३५, रा. बलवडी, ता. खानापूर) गजाआड आहे. आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.

मालन यांच्या नावावर बलवडी व शेटफळे येथे शेती आहे. त्यांनी ती नातू प्रवीण जाधव यांच्या नावावर केल्याने कुटुंबातील काही जण नाराज होते. दीड महिन्यापासून त्या नातवाच्या घरी राहत होत्या. त्यांच्याकडे पैसेही चांगले होते. गावातील लोकांना त्या हातउसने पैसेही देत असत.

३० जून रोजी पहाटे सुमारे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर गेलेल्या मालन घरात परतत असताना संशयिताने त्यांना धक्का देऊन खाली पाडले. मारहाण करून अंगावरील सुमारे १४ ग्रॅम सोन्याचे व ३० भार चांदीचे दागिने हिसकावले. त्यांनी प्रतिकार केल्यानंतर त्याने त्यांच्यावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिले आणि पसार झाला.

मरण्यापूर्वी मुलाला सांगितली हकीकत

गंभीर भाजलेल्या मालन यांना मुलगा विठ्ठल यांनी रुग्णालयात दाखल केले. सांगलीला नेत असताना त्यांनी मुलाला घडलेला प्रकार सांगितला; मात्र पोलिसांचा जबाब नोंदविण्यापूर्वीच त्या बेशुद्ध झाल्या आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुलाला सांगितलेल्या हकीकतीमुळे गुन्ह्याचा छडा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT