कवठेमहांकाळ : घरात कोणीही नसताना आईनेच आपल्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीवर कात्रीने वार करून तिची निर्घृण हत्या केला. ही घटना मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तिरमलवाडी-देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथे घडली.
श्रीशा महादेव क्षीरसागर (वय १ वर्ष) असे मृत चिमुकलीचे नाव असून, याप्रकरणी आई अनिता महादेव क्षीरसागर (२६, रा. तिरमलवाडी) हिच्याविरुद्ध कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
चिमुकलीचे वडील महादेव क्षीरसागर हे सलूनचा व्यवसाय करतात. मंगळवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे दुकानात गेले होते. त्यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून अनिता हिने चिमुकलीवर कात्रीने वार केले. मान व शरीरावर गंभीर दुखापत झाल्याने चिमुकलीचा जागीच तडफडून मृत्यू झाला. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि चिमुकलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. आईने पोटच्या गोळ्याचा एवढ्या क्रूरपणे जीव का घेतला, यामागील नेमके कारण उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.