जत : जत तालुक्यातील देवनाळ येथे ५७ वर्षीय मूकबधिर व दृष्टिहीन महिलेवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून १९ वर्षीय तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी केशव राजाराम घाटगे (वय १९, रा. देवनाळ, ता. जत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ जून रोजी दुपारी घडली आहे.
पीडित महिला आपल्या वृद्ध आई-वडिलांसोबत तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. ती जन्मापासून मूकबधिर असून दृष्टिहीन आहे. फिर्यादी महिला ३१ मे रोजी नातेवाईकांच्या निधनामुळे परगावी गेल्या होत्या. त्यावेळी घरातील वृद्ध पती व मुलीसाठी जेवणाची व्यवस्था करण्याबाबत त्यांनी नातेवाईकांना सांगितले होते. मात्र, दरम्यान, १ जूनरोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्या असता घराला कुलूप असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी घराच्या जिन्याखालून आवाज आल्याने त्या तेथे गेल्या असता गावातील एका संशयित तरुणाने त्यांच्या मूकबधिर व दृष्टिहीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे दिसून आले. पीडित महिलेच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर संबंधित व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाली. घटनेची माहिती फिर्यादीने आपले पती व नातेवाईकांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी चर्चा करून जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.