जत : जत तालुक्यातील श्री अल्लमप्रभू देवस्थान येथील सुमारे साडेसतरा लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचा चार्ज नव्या समितीकडे न देता शासकीय मालमत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी देवस्थानच्या माजी अध्यक्षांसह ११ माजी पदाधिकाऱ्यांविरुद्ध उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे देवस्थानच्या कारभारात खळबळ उडाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे (कोल्हापूर) प्रभारी सहायक सचिव महादेव बाबुराव दिंडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार, श्री अल्लमप्रभू देवस्थानची स्थावर व जंगम मालमत्ता देवस्थान व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात आली होती. सन २०१६ मधील शासकीय मूल्यांकनानुसार देवस्थानाकडे सहा तोळ्यांची मोहनमाळ, सहा तोळ्यांचा चेनहार आणि चार तोळ्यांचे लिंगगोफ असे एकूण १७ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असल्याची नोंद आहे.
देवस्थानच्या जुन्या स्थानिक सल्लागार उपसमितीची मुदत संपल्यानंतर २५ जानेवारी २०२४ रोजी नवीन उपसमिती नियुक्त करण्यात आली. त्यानंतर माजी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना देवस्थानाचा संपूर्ण चार्ज नव्या समितीकडे सुपूर्द करण्याबाबत वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या. जानेवारी २०२५ मध्ये देवस्थान परिसरात झालेल्या बैठकीत चार्ज देण्याचे लेखी आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त (पुणे) यांच्याकडे दावा प्रलंबित असल्याचे कारण देत चार्ज देण्यास टाळाटाळ करण्यात आली.