Sangli News: फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणांवर हातोडा Pudhari
सांगली

Sangli News: फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणांवर हातोडा

पत्रकारनगरमध्ये महापालिकेची कारवाई : 22 अतिक्रमणे काढली; वादावादी, तणाव

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मंगळवारी शहरातील झुलेलाल चौक ते शंभरफुटी रस्त्यावरील (पत्रकारनगर रस्ता) फ्रंट मार्जिनमधील 22 अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने हटविली. या कारवाईवेळी काही ठिकाणी वादावादीचे प्रकार घडले. पण महापालिकेने पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. यापूर्वी संबंधितांना नोटीस बजावून अतिक्रमण काढून घेण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र 48 पैकी 22 मालमत्ता धारकांची फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणे ‌‘जैसे थे‌’ होती. त्यामुळे मंगळवारी आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

पत्रकारनगर रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाने 48 मालमत्ता धारकांना नोटिसा बजावल्या होत्या. महापालिका निवडणुकीमुळे कारवाई रखडली होती. दरम्यान, निवडणूक झाल्यानंतर महापालिकेने पुन्हा अतिक्रमणे, विनापरवाना बांधकामांविरोधात कारवाई सुरू केली आहे. सोमवारी विश्रामबाग चौकाजवळील विनापरवाना 68 खोकी काढण्यात आली. मंगळवारी पत्रकारनगर रस्त्यावरील अतिक्रमणांकडे मोर्चा वळवण्यात आला. या कारवाईदरम्यान पत्र्याचे शेड, जाळ्या, बांधकामे, कट्टे, फलक तसेच काही खोकी काढण्यात आली. हा मार्ग अतिशय वर्दळीचा आहे, अतिक्रमणांमुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत होती, प्रशासनाच्या या मोहिमेमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.

कारवाईवेळी किरकोळ वादावादीचे प्रकारही घडले. उपायुक्त स्मृती पाटील, अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख तथा सहायक आयुक्त नागार्जुन मद्रासी, नगररचना विभागाचे अभियंता यासिन मंगळवारे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पत्रकारनगरमधील फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणे हटविली. दरम्यान, नगरसेवक मंगेश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. फ्रंट मार्जिनमधील संरक्षक भिंती पाडण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.

गटारीवरील खोक्यांचे काय?

महापालिकेने झुलेलाल चौकाजवळ पत्रकारनगर रस्त्यावरील गटारीवर खोकी पुनवर्सन केले आहे. या खोक्यांसमोर रस्त्यावरच वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. त्याबाबत महापालिका काय निर्णय घेणार आहे?, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला. या खोक्यांचे अन्यत्र पुनर्वसन करावे, तसेच हा रस्ता वाहतुकीस मोकळा करावा, अशी मागणीही करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT