सश्रम कारावास pudhariphoto
सांगली

Sangli Crime : खुनी हल्लाप्रकरणी तीन वर्षे सश्रम कारावास

ईश्वरपूर न्यायालयाचे आदेश ः जखमीला 25 हजार रुपये भरपाई

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : उसने पैसे न दिल्याच्या रागातून वाहन विमा एजंटवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सुहेल रियाज बारसकर (वय 38, रा. ईश्वरपूर) याला न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अचला काशीकर यांनी हा निकाल दिला. तसेच जखमीला 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

ईश्वरपूर येथे दोन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. या हल्ल्यात सैफ फैयाज दिवाण (रा. सावकार कॉलनी, ईश्वरपूर) हे गंभीर जखमी झाले होते. 8 जून 2022 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुहेल बारसकर हा सैफ दिवाण यांच्या घराकडे गेला होता. त्याने दिवाण यांच्याकडे उसने पैसे मागितले, मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून, ‌‘पैसे असून तू का देत नाहीस, तुला संपवतोच‌’ असे म्हणत सुहेलने आपल्याकडील कोयत्याने दिवाण यांच्या डोक्यात वार केला. यामध्ये दिवाण हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. याप्रकरणी त्यांनी ईश्वरपूर पोलिसात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी बारसकर याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने एकूण 11 साक्षीदार तपासले. फिर्यादी सैफ दिवाण, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, वैद्यकीय अधिकारी, उपनिरीक्षक सागर गायकवाड यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. शुभांगी पाटील यांनी काम पाहिले. त्यांना सहायक उपनिरीक्षक शरद जाधव, हवालदार उत्तम शिंदे, सुनील पाटील, प्रमोद आपटे आणि संदीप शेटे यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT