सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीला डावलून एमआरडीपीअंतर्गत ५०८ कोटी रुपयांच्या कामाची वर्क ऑर्डर दिल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी न्या. शर्मिला देशमुख व न्या. अभय मंत्री यांच्यासमोर सुनावणी झाली. महापालिका प्रशासनाने दोन आठवड्यांत म्हणणे सादर करावे, असे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणाची सुनावणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे.
महाराष्ट्र रेजिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) अंतर्गत महापालिका क्षेत्रात प्रस्तावित पावसाळी पाणी निचरा आणि शहरी पूर नियंत्रण प्रकल्पाला महापालिका आयुक्तांनी कार्यारंभ आदेश दिलेला आहे. ठेकेदाराला दिलेल्या लेटर ऑफ अॅक्सेप्टन्सच्या विरोधात बागवान यांनी याचिका दाखल केली होती. मात्र, त्यानंतर प्रशासनाने वर्क ऑर्डर दिल्याने याचिकेत त्याचाही समावेश करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
शुक्रवारी सुनावणीवेळी याचिकाकर्ते हे नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य असल्याचे त्यांचे वकील ॲड. आशुतोष कुलकर्णी यांनी सांगितले. त्यावर स्थायी समितीने या कामाला मंजुरी दिली आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर मंजुरी नसल्यामुळेच याचिका दाखल केल्याचे न्यायालयात सांगितले. महापालिका प्रशासनातर्फे बाजू मांडताना महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ४५३ अन्वये वर्क ऑर्डर दिली आहे. त्यासाठी स्थायी समितीची स्वतंत्र मान्यता घेण्याची आवश्यकता नसल्याची भूमिका मांडली.