Court File Photo
सांगली

Sangli News| महिलांना ८६ लाखांचा गंडा; दाम्पत्यास तीन वर्षे शिक्षा

जिल्हा न्यायालयाचा निकाल; ५० हजारांचा दंड

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महिला गृहउद्योग संस्थेच्या माध्यमातून तब्बल ८६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपी लक्ष्मण दुर्गाप्पा बंडगर (वय ३१) व कविता राजकुमार शिंदे तथा कविता लक्ष्मण बंडगर (वय २५, रा. रामकृष्ण परमहंस सोसायटी, सांगली) या दोघांना तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी ५० हजार रूपये दंडाची शिक्षा. सांगली येथील न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी सुनावली.

खटल्याची पार्श्वभूमी अशी- लक्ष्मण बंडगर हा मूळचा कास्तीखुर्द (जि. धाराशिव) येथील असून कविता शिंदे तथा कविता बंडगर ही मूळची सोन्याळ (ता. जत) येथील आहे. दोघांनी जानेवारी २०२४ मध्ये रामकृष्ण परमहंस सोसायटी येथे गुरूकृपा महिला गृहउद्योग नावाची संस्था स्थापन केली. महिलांना पॅकिंगचे काम देतो असे सांगून प्रत्येक महिलेकडून दहा ते पंधरा हजार रूपये अनामत म्हणून घेतले. सुमारे एक हजार ते १८०० महिलांकडून दोघांनी रक्कम गोळा केली. सुरुवातीला त्यांना काम दिले. त्यानंतर त्यांनी महिलांना कंपनीतच काम करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून रोख तसेच त्यांच्या खात्यावरून पैसे घेतले. दोघांनी महिलांची सुमारे ८६ लाख २८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चंद्रकांत महादेव कडोले (रा. प्रगती कॉलनी, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध डिसेंबर २०२४ मध्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांकडून वजनकाटे व सहा लाखांची मोटार जप्त केली.

विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील पोवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी वकील पटवेगार यांनी सरकारतर्फे काम पाहिले. त्यानुसार लक्ष्मण बंडगर व कविता शिंदे ऊर्फ कविता बंडगर या दाम्पत्याला दोषी ठरवले. दोघांना ३ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी ५० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ९ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. दोघे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT