सांगली

Sangli illegal liquor crackdown: सांगलीत जेसीबीने गावठी हातभट्टी उद्ध्वस्त

पुण्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस ॲक्शन मोडवर : 750 लिटर रसायन नष्ट

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुणे येथे विषारी दारूमुळे 17 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर सांगली पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कर्नाळ (ता. मिरज) येथे ओढ्यालगत सुरू असलेली एक मोठी गावठी हातभट्टी पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे उद्ध्वस्त केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी 750 लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन आणि इतर साहित्य जप्त करून जागीच नष्ट केले.

याप्रकरणी नितेश कुंभारमारवाडी आणि संजय कुंभारमारवाडी (दोघे रा. कंझारभाट वस्ती, कर्नाळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघेही फरार आहेत. जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसाय आणि हातभट्टी दारू उत्पादकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अपर अधीक्षक कल्पना बारावकर यांनी दिले आहेत.

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या सूचनेवरून पोलिस पथक गस्तीवर होते. यावेळी माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावर कर्नाळ हद्दीत ओढ्यालगत कोळसा आणि लोखंडी बॅरलचा वापर करून बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने वाहने रस्त्याच्या कडेला थांबवून ओढ्याच्या दिशेने छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच तिथे काम करणाऱ्या दोन्ही संशयितांनी घटनास्थळावरून धूम ठोकली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, संपूर्ण परिसरात तीव्र उग्र वास येत होता. संशयितांनी पोलिसांची नजर चुकवण्यासाठी जमिनीमध्ये ठरावीक अंतरावर लोखंडी बॅरल्स पुरून ठेवल्याचे दिसून आले. त्या बॅरल्सच्या शेजारीच लाकडे पेटवल्याच्या खुणा आणि कोळसा मिळून आला. जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशीच विशेष मोहीम राबवून अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT