मिरज : कोल्हापूर येथील बनावट नोटा प्रकरणात अटकेत असणारा मुख्य सूत्रधार व त्याच्या साथीदाराची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. बनावट नोटाप्रकरणी मुख्य सूत्रधार बडतर्फ पोलिस इब्रार इनामदार व त्याचा साथीदार नरेंद्र शिंदे या दोघांना पोलिस कोठडी वाढवून मिळाली होती. त्यांना गुरुवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. परंतु न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
कोल्हापूर येथे बनावट नोटा छापण्याचा कारखाना थाटण्यात आला होता. मिरजेमध्ये बनावट नोटा कमिशनवर देण्यासाठी सुप्रीत देसाई हा आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला होता. या प्रकरणात मुख्य सूत्रधार असणारा इब्रार इनामदार याला विना चौकशी पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. या प्रकरणाचा सखोल तपास करावयाचा असल्याने मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार व त्याचा साथीदार नरेंद्र शिंदे या दोघांची पोलिस कोठडी वाढवून मागण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने आणखीन दोन दिवस त्यांना कोठडी दिली होती. गुरुवारी त्यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणांमध्ये आणखीन एकजण संशयित असून त्याची चौकशी करावयाची असल्याने पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी करण्यात आली. परंतु न्यायालयाने मात्र दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान कोल्हापुरातून अटक करण्यात आलेला अभिजित पोवार याची शुक्रवारी पोलिस कोठडी संपणार आहे. त्यामुळे त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.