Pudhari
सांगली

Sangli Contractor Kidnapping: कंत्राटदाराचे अपहरण करून मारहाण; पाच लाखांची खंडणी

ईश्वरपुरातील घटनेने खळबळ : राजकीय पक्षाच्या माजी महिला पदाधिकाऱ्यासह ८ जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : समाजमाध्यमांवरून ओळख वाढवून कॉफीच्या बहाण्याने बोलावून घेत एका कंत्राटदाराचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करत ५ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी ईश्वरपूर येथे घडला. या प्रकरणी एका राजकीय पक्षाच्या माजी महिला पदाधिकाऱ्यासह ८ जणांविरुद्ध ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्निल प्रदीप बाजारे (रा. किसाननगर, ईश्वरपूर) यांनी यासंदर्भात शुक्रवारी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुप्रिया ऊर्फ प्रियंका जाधव, एका राजकीय पक्षाची माजी पदाधिकारी भाग्यश्री जितेंद्र माने, रोहन पाटील आणि त्यांच्या ५ ते ६ अनोळखी साथीदारांविरुद्ध अपहरण, जबरी चोरी आणि खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल बाजारे यांचे बसस्थानक परिसरात ऑनलाइन टेंडर व डिजिटल सिग्नेचरचे ऑफिस आहे. १५ दिवसांपूर्वी सुप्रिया हिने ‘मला कामाची गरज आहे, तुमच्याकडे काम मिळेल का?’ अशी विचारणा करत त्यांच्याशी फोन व व्हॉट्सॲप मेसेजवरून संपर्क साधला. बुधवारी सकाळी ११ वाजता ती बाजारे यांना प्रशासकीय इमारत परिसरातील एका कॉफी शॉपमध्ये भेटण्यासाठी आली. कॉफी घेत असतानाच रोहन पाटील व त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी बाजारे यांना शिवीगाळ व मारहाण करत त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला.

अपहरण करून पोल्ट्रीवर नेले

संशयितांनी बाजारे यांना जबरदस्तीने मोटारीमध्ये बसवून नवेखेड रस्त्यावरील एका पोल्ट्री फार्मवर नेले. ‘सुप्रिया माझी बहीण आहे, तू तिच्याशी चॅटिंग का करतोस?’ असा जाब विचारत त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी एका राजकीय पक्षाची माजी पदाधिकारी असलेल्या भाग्यश्री माने हिला तेथे बोलावून घेतले. भाग्यश्री हिने प्रकरण मिटवण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली.

ऑनलाइन ५ लाख उकळले

मारहाणीच्या धाकाने संशयितांनी दिलेल्या बँक खात्यावर बाजारे यांना मोबाईलद्वारे तातडीने ५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. घडलेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना सोडून देण्यात आले. बाजारे यांनी शुक्रवारी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT