सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा निचरा कामांसाठी प्रस्तावित ५९२ कोटी रुपयांच्या कामांची वर्क ऑर्डर करारातील काही अटींवरून रखडली आहे. ठेकेदाराला लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स दिलेले असून, ठेकेदाराने डिपॉझिट आणि अन्य आवश्यक रक्कमही भरली आहे. मात्र, शासनाच्या 'मित्रा' या एजन्सीने तयार केलेल्या ॲग्रीमेंटमधील तीन-चार अटींवरून अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे ठेकेदाराने करारपत्रावर स्वाक्षरी केलेली नाही. परिणामी वर्क ऑर्डर जारी करण्याची प्रक्रिया पुढे सरकलेली नाही.
महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (एमआरडीपी) अंतर्गत महापालिका क्षेत्रातील ५९२ कोटी रुपयांच्या पावसाळी पाणी निचरा प्रकल्पासाठी शासनाने निविदा स्वीकृती पत्र (लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स) ऑगस्ट २०२६ मध्ये दिलेले आहे. पुढील प्रक्रियेचा भाग म्हणून ठेकेदाराला परफॉर्मन्स सेक्युरिटी डिपॉझिट आणि एन्व्हायरमेंटल डिपॉझिट जमा करण्यासाठी २८ दिवसांची मुदत दिली होती.
ठेकेदाराकडून अनामत रक्कम जमा झाल्यानंतर कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर ठेकेदाराने अनामत रक्कम जमा केली. दरम्यान, करारनामा अर्थात ॲग्रीमेंटमधील काही अटींबाबत ठेकेदाराने आक्षेप घेतल्याचे समजते.
ॲग्रीमेंटमध्ये प्रकल्पासाठी ठेकेदाराला आठ टक्के मोबिलायझेशन ॲडव्हान्स देण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, ठेकेदाराकडून दहा टक्के ॲडव्हान्सची मागणी होत असल्याचे समजते. याशिवाय नाल्यांसंदर्भातील प्रिकास्ट आणि बांधकामाच्या दरांशी संबंधित मुद्दाही प्रलंबित असल्याचे समजते.