तासगाव : शहरातील दूषित पाणीपुरवठा, रस्त्यांवरील खड्डे, अनियमित घंटागाडी आणि गटारांच्या अस्वच्छतेच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नगरपालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रलंबित नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवकांनी नगरपालिकेसमोर काळ्या फिती लावून आंदोलन केले.
शहरातील काही भागांत दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत संबंधित पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तपासणी व दुरुस्ती करून नागरिकांना स्वच्छ पाणी द्यावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली. यासोबतच शहरातील खड्डे बुजवून तासगाव खड्डेमुक्त करावे, सर्व प्रभागांत दररोज घंटागाडी नियमित सुरू ठेवावी आणि नाले व गटारांची स्वच्छता करावी, अशा मागण्या केल्या. प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
या आंदोलनात विरोधी पक्षनेत्या सुशिला जाधव यांच्यासह नगरसेवक अरुण साळुंखे, अभिजित देशिंगकर, रामभाऊ माळी, अफजल मुजावर, उषा कांबळे, शोभा जाधव, स्वप्निल जाधव आणि दीपक जाधव सहभागी झाले होते. सभागृहातही जोरदार घोषणाबाजी नगरपालिकेसमोर काळ्या फिती लावून निषेध नोंदवल्यानंतर पालिकेच्या सभागृहातही याचे पडसाद उमटले. सभेदरम्यानही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.