Court Verdict  Pudhari
सांगली

Sangli Sessions Court: सहमतीने केलेले कृत्य बलात्कार ठरत नाही

आरोपी निर्दोष; सत्रन्यायालयाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सहमतीने केलेले कृत्य म्हणजे बलात्काराचा गुन्हा ठरत नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत सांगली येथील सत्र न्यायाधीश श्रीमती जे. ए. मोहंती यांनी एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यामध्ये बचाव पक्षाच्या वकिलांनी यासंदर्भातील विविध न्यायनिवाडे न्यायालयात सादर केले होते.

खटल्याची पार्श्वभूमी अशी की, जुना बुधगाव रस्ता परिसरात पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह राहत असून ते कचरा गोळा करण्याचे काम करतात. त्याच परिसरात नवीन राहण्यास आलेल्या एका तरुणाशी तिची ओळख झाली आणि नंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ऑक्टोबर २०२३ व त्यानंतरच्या सहा महिन्यांत राहुलने तिला एकांतात बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

दरम्यान, मुलीमध्ये शारीरिक बदल दिसून आल्यानंतर आईने तिच्याकडे विचारपूस केली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी संबंधित तरुणाकडे पीडित मुलीशी लग्न करण्याबाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला नकार दिला. त्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली. त्यानंतर पीडित मुलीने फौजदारी संहिता १६४ अन्वये न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवला होता.

तपासादरम्यान पीडित मुलगी व आरोपी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यासाठी पोलिसांनी सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) व इतर पुरावे गोळा केले होते. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाला जबरदस्तीने बलात्कार झाल्याचे सिद्ध करता आले नाही. त्यामुळे सहमतीने झालेले कृत्य बलात्कार मानले जाऊ शकत नाही, असा निष्कर्ष नोंदवत न्यायालयाने संबंधित तरुणाची निर्दोष मुक्तता केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT