सांगली

सांगली : कडेगावात काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत: भाजपचा सुफडासाफ

अविनाश सुतार

कडेगाव : रजाअली पिरजादे : कडेगाव तालुक्यातील नुकत्याच झालेल्या 39 पैकी 33 ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. तर भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसने आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला. जिल्ह्यात भाजपचा हा सर्वात मोठा पराभव आहे. त्यामुळे भाजपवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. तर काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या पश्चात झालेल्या निवडणुकीत डॉ. विश्वजित कदम यांनी आपले नेतृत्व व कडेगाव आणि पलूस तालुक्यातील आपले वर्चस्व सिद्ध केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कडेगाव तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी 30 वर्षाहून अधिक काळ माजी मंत्री दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांनी आपले निर्विवाद वर्चस्व ठेवले. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र, माजी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी धुरा सांभाळली आहे. नुकतेच तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. एकूण 43 ग्रामपंचायतींपैकी शाळगाव व उपाळे मायणी या ग्रामपंचायतीने गायरान जमीन संदर्भात निवडणुकीवर बहिष्कार घातला. तर विहापूर आणि येवलेवाडी या ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या त्यामूळे 39 ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक झाली. डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली व शांताराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसने ही निवडणूक लढवली.

या निवडणुकीत काँग्रेने स्व डॉ पतंगराव कदम यांनी केलेल्या विकास कामांचा लेखा जोखा मांडला. तर माजी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कालावधीत विकास कामांसाठी दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी व केलेली विकास कामे जनतेपुढे योग्य पद्धतीने मांडले. काँग्रेसने कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत झालेल्या चुकांची दुरुस्ती करीत व मायक्रोप्लॅनिंग केले. तर बहुतांश गावागावात काँग्रेस अंतर्गत गटबाजी मोडून काढत एकजुटीने निवडणूक लढवली. त्यामुळे काँग्रेसने मोठे यश प्राप्त करीत नगरपंचायत निवडणुकीतील पराभवाचे उट्टेही काढले.

तर, दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे नेतृत्व करीत होते. केंद्रात व राज्यात असलेल्या सत्तेचा फायदा भाजपला उठवता आला नाही. केंद्र, राज्य व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भाजपने केलेली विकासकामे जनतेपुढे ठेवता आली नाहीत. या निवडणुकीत अतिआत्मविश्वासही भाजपला नडला. त्यामुळे भाजपचे या निवडणुकीत 'पानिपत; झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कडेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही एन्ट्री करीत आपले नशीब अजमवण्याचा प्रयत्न केला होता. कडेगाव नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा फटका काँग्रेसला बसला होता. मात्र, यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बहुतांश ठिकाणी काँग्रेससोबत तर काही ठिकाणी भाजपसोबत तर काही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवली. एकूण सदस्य पदासाठी 98 उमेदवार त्यांनी उभे केले होते. त्यापैकी 28 उमेदवारांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीलाही यश मिळाले असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT