सांगली : गरीबों की सारी कमाई... खा गयी महंगाई, चले जाव... चले जाव... भाजप सरकार चले जाव, गली गली में शोर है, महंगाई का जोर है... अशा घोषणांनी स्टेशन रोडवरील पेट्रोल पंप परिसर दणाणून गेला. महागाईविरोधात काल सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने भाजपा सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी, आजचे मोदी सरकार महागाई रोखण्यामध्ये अपयशी ठरले असल्याचे सांगून, सर्वसामान्य जनतेला महागाईमुळे जगणे कठीण झाल्याची भावना व्यक्त केली. पंतप्रधानांनी कसरतीच्या केलेल्या सूचना पाच राज्यांच्या निवडणुकीच्या अगोदर का केल्या नाहीत? सामान्य जनतेला उपदेश देत, ते स्वतः मात्र परदेश दौरे का करीत आहेत? याविरुध्द लवकरच जिल्हास्तरावर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
डॉ. सिकंदर जमादार यांनी, जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांना लागणारे खत देण्यातही सरकार अपयशी ठरल्याची टीका करून, शेतकरी, कामगार, विद्यार्थ्यांच्या विरोधी असलेल्या या सरकारविरुध्द एकत्रित लढा देऊ, असा इशारा दिला. सुभाष खोत, नगरसेवक सागर बिरनाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी आंदोलनात डी. पी. बनसोडे, अजित ढोले, नगरसेवक मयूर पाटील, प्रमोद सूर्यवंशी, अंजली जाधव, अरुण पळसुले, दिलीप पाटील, विक्रम सावर्डेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.