आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी तालुक्यात दूध भेसळ बाबत तक्रार दाखल झाल्याने आज (दि. १४) अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकत कारवाई केली. सकाळी चार पथकांनी दूध सेंटर व चिलिंग सेंटर अशा पाच ठिकाणी धाडी टाकत तपासणी केली. सांगली जिल्हा दुग्ध विकास अधिकारी नामदेव दवडते, अन्न सुरक्षा अधिकारी डी. एच. कोळी, एस.ए.केदार, सी.आर.स्वामी, एस.व्ही. हिरेमठ आणि पथकाने ही तपासणी केली. परंतु या छाप्यात काहीच सापडले नसल्याने ही कारवाई देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे.
आटपाडी तालुक्यामध्ये सुरू असणाऱ्या दूध भेसळीवर कारवाई करण्याची मागणी केली आणि कारवाई न झाल्यास आज (दि. १४) जीवन संपवणार असल्याचा इशारा दिला होता. सांगली पोलीसांनी आज (दि. १४) साळुंखे यांना खबरदारी म्हणून ताब्यात घेतले. तसेच आज पुन्हा अन्न व औषध प्रशासनाच्या चार पथकांनी बनपुरी येथील चिलिंग सेंटरवर संकलन होणाऱ्या दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले. आज (दि. १४) अचानक एकाचवेळी पाच ठिकाणी तपासणी सुरू झाल्याने दूध भेसळीचे रॅकेट चालवणाऱ्यांची पळता भुई थोडी अशी परिस्थिती झाली.
हिवतड येथील ऋषीकेश साळुंखे या शेतकऱ्याने याआधी दूध भेसळबाबत तक्रार केली होती. दूध भेसळ करणाऱ्यांना रंगेहाथ पकडुन देखील दिले होते. चार महिन्यांपूर्वी ही छापेमारी करण्यात आली होती. परंतु यावर कोणतीच कडक कारवाई झाली नाही. बनपुरीत देखील गुप्त कारवाई दरम्यान भेसळयुक्त दूध ओतून देण्यात आले होते. तसेच भेसळ करण्यासाठीचे साहित्य देखील जप्त केले. परंतु दूध सेंटर सील करून दूध सेंटर चालकांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली नाही. साळुंखे यांनी याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह दुग्ध विकास मंत्री यांच्याकडे याबाबत तक्रार केली. दूध भेसळीमुळे जिल्हा कॅन्सरग्रस्त होईल, त्यामुळे वेळीच कारवाई करा आणि भेसळ करणाऱ्यांना थांबवा असे निवेदन दिले.
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाई दरम्यान दोषी आढळलेल्या एका व्यक्तीने ठिकाण बदलून पुन्हा नव्या जागी आणि विना परवाना चिलिंग सेंटर सुरू केले आहे. हे धाडस केवळ अन्न व औषध प्रशासनाने घेतलेल्या बोटचेपी भूमिकेमुळे निर्माण होत आहे. मी जीवन संपवणार असल्याचा इशारा दिल्यावर मला ताब्यात घेऊन कारवाईचा बहाणा करण्यात आला आहे. हे प्रशासन एखादा बळी गेल्यावरच जागे होणार आहे का? असा सवाल ऋषिकेश साळुंखे यांनी केला.