सांगली : येथील कोल्हापूर रस्त्यावरील जे.व्ही. मोटर्स या कंपनीला तब्बल १ कोटी ५५ लाख ५० हजार रुपयांना गंडा घालत फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याबाबत कंपनीचे अकाऊंट व्यवस्थापक अमीर निजाम जमनावाले यांनी भामट्या विरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शहरातील कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणीजवळ जे.व्ही. मोटर्स हे टाटा मोटर्स कार विक्रीचे शोरूम आणि सर्व्हिस सेंटर आहे. कंपनीची दुसरी शाखा युनिटी मोटर्स नावाने कोल्हापूर येथे आहे. मुख्य शाखा पुणे येथे आहे. कंपनीचे सीईओ आर्थिक व्यवहाराबाबत ‘व्हॉटस्अॅप’ वर मेसेज पाठवत असतात. या मेसेजमध्ये दिलेल्या बँक खात्यावर जे.व्ही. मोटर्समधून रक्कम पाठवली जाते. त्यामुळे याचा गैरफायदा घेत भामट्याने कंपनीचे सीईओ यांचा फोटो ‘डीपी’ वर ठेवून अन्य मोबाईल क्रमांकावरून युनिटी मोटर्स प्रा. लि. कोल्हापूरचे अकाऊंट व्यवस्थापक प्रशांत पाटील यांना ५७ लाख रुपये व ९८ लाख ५० हजार रुपये पाठवण्याबात मेसेज पाठवला. त्यासाठी दोन खाते क्रमांक देखील पाठवले. ‘डीपी’ वर कंपनीच्या ‘सीईओ’ यांचा फोटो बघितल्यामुळे हा नेहमीप्रमाणे आर्थिक व्यवहाराचा मेसेज असल्याची खात्री झाली.
पाटील यांनी यांनी जे.व्ही. मोटर्सचे आर्थिक व्यवहार बघणार्या जमनावाले यांना ‘सीईओ’ यांचा मेसेज पाठवला. त्यानुसार जमनावाले यांनी कंपनीच्या फेडरल बँकेच्या खात्यावरून बंधन बँक शाखा प्रधाननगरच्या खात्यावर ५७ लाख रुपये तर येस बँक शाखा कर्नुळ -आंध्र प्रदेशच्या खात्यावर ९८ लाख ५० हजार पाठवले. त्यानंतरही युनिटी मोटर्सच्या पाटील यांना आणखी रक्कम पाठवण्याबाबत मेसेज आले. परंतु, जे.व्ही. मोटर्सच्या खात्यातील रक्कम संपली तरी मेसेज आले. त्यानंतर पाटील यांनी थेट ‘सीईओ’ यांना कॉल केला. तेव्हा त्यांनी मी मेसेज पाठवलेच नसल्याचे सांगितले.