सांगली : “गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर आयुष्याला दिशा देणारी व्यक्ती.” या सुविचाराचा प्रत्यय सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आला. सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. आपल्या गुरुंचे अचानक आगमन झाल्याने विद्यमान जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले.
गायकवाड यांचे कार्यालयात आगमन होताच घोष यांनी अत्यंत आपुलकीने त्यांचे चरणस्पर्श करून स्वागत केले. केवळ स्वागतच नव्हे, तर आपल्या गुरुंना आपल्या खुर्चीवर बसवून त्यांनी मनस्वी आदर व्यक्त केला. गुरुंसमोर शिष्याचा हा नम्र भाव पाहून उपस्थित अधिकारी आणि कर्मचारीही काही क्षण भारावून गेले. “गुरुची महती शब्दांत मावत नाही; गुरुचा आशीर्वाद आयुष्याची दिशा बदलतो,” असे म्हटले जाते. त्याचीच सुंदर अनुभूती या भेटीत पाहायला मिळाली. प्रशासकीय क्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळताना गुरु-शिष्याचे नाते जपणारा हा प्रसंग उपस्थितांसाठी विशेष ठरला. गायकवाड आणि घोष यांच्यातील संवादात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मात्र, या भेटीचा सर्वाधिक भावणारा क्षण होता तो म्हणजे गुरुंच्या सन्मानासाठी शिष्याने स्वतःची खुर्ची सोडणे! हा प्रसंग पाहून उपस्थितांच्या चेहऱ्यावरही आपसूकच हास्य उमटले.
गायकवाड निवृत्तीनंतर आता यशदा, पुणे येथे अतिरिक्त महासंचालक आहेत. शनिवारपासून ते सांगलीला आले होते. त्यांनी सहज जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देण्याचा निर्णय घेतला. ही इमारत बांधण्यासाठी सर्वाधिक कष्ट त्यांनीच घेतले होते. या ठिकाणी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातील छायाचित्रांसह अनेक कटआऊट्स येथे लावण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यात पर्यटनासाठी त्यांनी खूप उत्तम काम केले आहे. नदीचा घाट त्यांच्या कार्यकाळात झाला. महसूल विभागातील जुन्या साहित्याचे म्युझियम बांधण्याचे त्यांचे काम अपूर्ण राहिले. याबाबत डॉ. घोष यांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
डॉ. घोष यांची महाराष्ट्रात नेमणूक झाल्यानंतर शेखर गायकवाड यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. गायकवाड हे त्यांच्यासमोरील आदर्श आहेत, अशी माहिती डॉ. घोष यांनी दिली. त्यांना केबिनमध्ये घेऊन गेले. आपल्या खुर्चीवर त्यांना बसवून शेजारी थांबून त्यांनी सेल्फी काढला. यावेळी गायकवाड यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.