जत : डफळापूर (ता. जत) येथे महापुरुषाच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले डिजिटल काढण्याच्या वादातून शनिवारी सकाळी दोन गट आमने-सामने आले. या वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. दगडफेक तसेच तलवार, कोयता, लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याने सात ते आठ जण जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत. या घटनेत अनेक दुचाकी, पाच ते सहा चारचाकी वाहने तसेच दुकानांचे मोठे नुकसान झाले.
घटनेनंतर डफळापूरमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही काळ संचारबंदी लागू केली. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. सांगलीचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, या घटनेमागे आणखी काही कारणे किंवा धागेदोरे आहेत का, याचाही पोलिस तपास करीत आहेत. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.
शुक्रवारी मिटलेला वाद; शनिवारी पुन्हा पेटला
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डफळापूरच्या मुख्य चौकात महापुरुषाच्या जयंतीनिमित्त डिजिटल लावण्यात आले होते. चौकाच्या सुशोभीकरणासाठी दोन दिवसांपूर्वी हे डिजिटल काढण्यात आले. डिजिटल काढण्यावरून तसेच डिजिटल एका कथित अवमानकारक ठिकाणी ठेवण्यात आल्याच्या कारणावरून दोन समाजात तणाव निर्माण झाला होता.
शुक्रवारी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रमुख नागरिकांनी एकत्र बैठक घेऊन हा वाद सामोपचाराने मिटविला होता. त्यामुळे परिस्थिती निवळल्याचे वाटत असतानाच शनिवारी सकाळी पुन्हा वादाची ठिणगी पडली. एका व्यक्तीवर डिजिटल काढल्याच्या कारणावरून हल्ला झाल्याचे सांगण्यात येते. हा प्रकार सोडविण्यास गेलेल्या व्यक्तीवरही हल्ला झाल्याने परिस्थिती अधिक चिघळली. या घटनेची माहिती गावात व परिसरात पसरताच दोन्ही गटांतील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यानंतर दगडफेक व हाणामारी सुरू झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. मात्र, दोन्ही गट आमने-सामने आल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.
पोलिसांची तातडीने घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्यासह पोलिस पथक डफळापूरमध्ये दाखल झाले. जमावाला शांततेचे आवाहन करण्यात आले. परिस्थिती गंभीर होत असल्याने सांगली, उमदी, मिरज व कवठेमहांकाळ येथून अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने काही काळ संचारबंदी लागू करण्यात आली.
जखमींची नावे...
डफळापूर येथे शनिवारी झालेल्या हाणामारीत नितीन राजाराम मलमे जखमी झाले आहेत, तर विशाल दिनकर चव्हाण (वय ३१) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत; मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. याशिवाय सूरज अशोक चव्हाण (२९), माजी ग्रामपंचायत सदस्य देवदास दादासाहेब चव्हाण (३८), प्रवीण चव्हाण, वरद युवराज चव्हाण (२५) हेही जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय मोहन धोंडिराम चव्हाण (४६) व मदन धोंडिराम चव्हाण (४३) हे देखील जखमी झाल्याचे समजते.