सांगली : ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरलेला सिव्हिल हॉस्पिटलमधला हा खास विभाग.  (छाया : सचिन सुतार)
सांगली

Sangli News : घाबरू नका... आम्ही आहोत की...

‌‘सिव्हिल‌’मध्ये ‌‘ज्येष्ठ नागरिक कक्षा‌’चा भक्कम आधार

पुढारी वृत्तसेवा

नंदू गुरव

सांगली : कितीतरी म्हातारी माणसं... आजारानं मरायला झालेली... पोरांनी दुर्लक्ष केलेली.. काय तरी औषधपाणी घ्यायचं म्हणून ‌‘सिव्हिल‌’ला येतात आणि इथं आलं की अजूनच जास्त घाबरतात. अडाणी, गावाकडच्या माणसांना कुठं जायचं, कसं जायचं काहीच समजत नाही. कावऱ्याबावऱ्या झालेल्या या ज्येष्ठांच्या पाठीवर तेव्हा आधाराचा हात पडतो, तो ‌‘ज्येष्ठ नागरिक कक्षा‌’चा. गेल्या 23 वर्षांपासून हा कक्ष ज्येष्ठ आजारी लोकांना मार्गदर्शन करतो आहे. घाबरू नका..काय होतंय सांगा..आम्ही आहोत..असं सांगत त्यांना आधार देतो आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे हजारो गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांसाठी हक्काचा दवाखाना. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून रोज हजारभर रुग्ण या रुग्णालयात येतात. तपासण्या करतात. डॉक्टरांचा सल्ला घेतात. औषधं घेतात. बऱ्याचदा ॲडमीट होतात आणि ठणठणीत बरं होऊन परत घरी जातात. या रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण बरंच मोठं आहे. ही वयस्कर लोकं जेव्हा इथं येतात तेव्हा अगोदरच घाबरुन गेलेली असतात. काहीच माहिती नसल्यानं गपगुमानं बसून रहातात. अशा वयस्कर रुग्णांना मार्गदर्शन व्हावं, त्यांना रुग्णांच्या लायनीत उभा रहायला लागू नये यासाठी 23 वर्षापुर्वी या त्यांच्या मार्गदर्शनासाठी खास कक्ष तयार करण्यात आला.

अनेकांनी या कक्षात सकाळी साडे नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत अगदी विनामोबदला सेवा दिली आहे. अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, समाजसेवा अधीक्षक संजय खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सद्या सेवानिवृत्त जवान महादेव थोरात, सेवानिवृत्त मेडिकल सुपरवायझर दत्तात्रय कुलकर्णी, शांताराम साळुंखे या कक्षात सेवा देत आहेत.

बांधिलकी आणि सेवा

ज्येष्ठ नागरिक रुग्णांचे केस पेपर काढणं, अपंगांसाठी अर्ज भरणं, मोफत उपचारांची माहिती देणं, सरकारी योजना समजाऊन सांगणं, देहदान-त्वचादान- नेत्रदानाबाबत आवाहन करणे या आणि इतर अनेक गोष्टी हा कक्ष काम करतो.

गेली 14 वर्षं मी केसपेपर काढण्यापासून ते साऱ्या योजना, विभागांची माहिती देण्यापर्यंत अखंडपणे या कक्षात सेवा देतो आहे. ज्येष्ठांचे अनेक बरेवाईट अनुभव ऐकायला मिळतात. इथं त्यांना मदत मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान लाखमोलाचं असतं, जे आम्ही रोज अनुभवतो आहोत.
- दत्तात्रय कुलकर्णी, मदतनीस, ज्येष्ठ नागरिक विभाग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT