सांगली : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या नातेवाईकांसाठीचे प्रतीक्षालय आता चकाचक झाले आहे.  
सांगली

Sangli News : नरकासारखं प्रतीक्षालय अखेर चकाचक

प्रशासनाला आली जाग; कार्यवाही सुरू

पुढारी वृत्तसेवा

नंदू गुरव

सांगली : सांगलीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात म्हणजे सिव्हिलमध्ये येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी परिसरात प्रतीक्षालय उभारण्यात आलं. पण तीन वर्षात त्याची अवस्था नरकासारखी झाली होती. दैनिक ‌‘पुढारी‌’ने ही परिस्थिती मांडल्यानंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने गुरुवारी हे प्रतीक्षालय धुऊन चकाचक केले. आता ही स्वच्छता राखण्याची जबाबदारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची आहे.

कशाही पडलेल्या खुर्च्या, वस्तू ठेवण्यासाठीची गंजून गेलेली कपाटं, खडखडणाऱ्या खिडक्या, थरथरणारे पंखे, बाटल्यांचा खच पडलेले वॉश बेसीन, नरकासारखी अवस्था झालेलं शौचालय, तुंबलेली घाण आणि परिसरात सुटलेली दुर्गंधी... अशा अवस्थेत असलेल्या प्रतीक्षालयाकडं साफ दुर्लक्ष झालं होतं. अवघ्या तीन वर्षांत या प्रतीक्षालयाचा पार नरक झाला होता. इतका खर्च करूनही नातेवाईकांना पुन्हा झाडाचाच आधार घ्यावा लागत होता. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची किमान दिवसभर थांबायची, जेवायची, पाण्याची सोय तरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असावी की नको? असा सवाल ‌‘पुढारी‌’तून मांडण्यात आला आणि गुरुवारी सिव्हिल प्रशासनानं हे प्रतीक्षालय चकाचक केलं. दिवसभर या प्रतीक्षालयात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. व्हरांडा, खुर्च्या, कपाटं, शौचालय, बेसीन सारं धुरून स्वच्छ करण्यात आलं.

आता जबाबदारी समाजाची

दैनिक ‌‘पुढारी‌’नं विदारक चित्र दाखवल्यानंतर सिव्हिल प्रशासनानं प्रतीक्षालय स्वच्छ केलं, पण आता ही स्वच्छता तशीच राखण्याची जबाबदारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची आहे. पादत्राणे बाहेर ठेवणं, स्वच्छतागृहात पाण्याचा पुरेसा वापर करणं, कपाटांची स्वच्छता ठेवणं, कचरा न करणं, कुठंही न थुंकणं या जबाबदाऱ्या त्यांनाच पार पाडाव्या लागणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT