'सिव्हील'मध्ये उघड्यावर औषधसाठा; ‘एफडीए’कडून नोटीस 
सांगली

Sangli News : 'सिव्हील'मध्ये उघड्यावर औषधसाठा; ‘एफडीए’कडून नोटीस

संबंधितावर कडक कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : येथील पद्‌मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना देण्यात येणारी औषधे वऱ्ह्यांड्यात , प्रसाधनगृहाजवळ, परिचारिका वसतिगृहाच्या परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी साठवून ठेवल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने रुग्णालय प्रशासनाला नोटिस पाठवली आहे. औषधांचा साठा व व्यवस्थापन करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे निरीक्षण औषध प्रशासनाच्या तपासणी अहवालात नोंदविले आहे. रुग्णांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण केल्याप्रकणी अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी सृष्टी संवर्धन फौंडेशनचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

याबाबत 'पुढारी'ने शासकीय रुग्णालयातील वऱ्हांड्यात, स्वच्छतागृहाजवळ औषधांचा साठा केल्याचे वृत्तप्रसिध्द केले होते. याची दखल घेत १८ जुलै २०२६ रोजी सहायक आयुक्त (औषधे) ज. प. सवदत्ती यांनी रुग्णालयातील औषध भांडाराची पाहणी केली. यावेळी पुरुष शल्य विभाग, स्त्री स्वच्छता गृह, परिचारिका वसतिगृह व कॅन्टीनजवळील पॅसेज तसेच बांधकाम सुरू असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात औषध साठा अयोग्य आणि अस्वच्छ स्थितीत साठवणूक केल्याचे आढळले. यामुळे रुग्णांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात अधिष्ठाता, वैद्यकीय अधिक्षक व औषध भांडारास नोटिस बजावण्यात आली आहे. यामध्ये औषधांची मोकळ्या आणि अस्वच्छ जागेत साठवणूक करण्यास, तसेच साठा नोंदणी न ठेवण्यास कारणीभूत असलेल्या जबाबदार व्यक्तींवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी तसेच याप्रकरणी संबंधित जबाबदार कर्मचारी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल देण्यात यावा असे नोटिसमध्ये म्हटले आहे.

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते, सृष्टी संवर्धन फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र वळवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. रुग्णांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या पद्धतीने औषधांचा साठा केल्याप्रकरणी संबंधित अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT