सांगली : येथील सिव्हिल हॉस्पिटलसमोरील अतिक्रमणांवर सोमवारी महापालिकेच्या पथकाने जेसीबी चालवला. तसेच रस्त्यावरील हातगाडे जप्त केले. महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी हे स्वत: रस्त्यावर उतरून कारवाईबाबत सूचना देत होते. दुकानांसमोरील शेड, बेकायदेशीर फलक, रस्त्यावरील कट्टे तोडण्यात आले. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
सलग पाच तास चाललेल्या या मोहिमेत गारपीर चौकापर्यंतचे अतिक्रमण हटवण्यात आले. महापालिकेचे अधिकारी आणि काही विक्रेत्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. मात्र महापालिकेने आक्रमक भूमिका घेत रस्ता मोकळा केला. सिव्हिल हॉस्पिटल ते शंभरफुटी रस्ता हा अतिशय वर्दळीचा आहे. या रस्त्यावर नेहमी मोठी रहदारी असते. सिव्हिल हॉस्पिटलबरोबरच खासगी रुग्णालये, औषधी दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र हा रस्ता अतिक्रमणांमुळे अरुंद बनला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी हा प्रकार नित्याचाच बनला आहे. त्यातून सतत अपघात घडत असतात. त्यामुळे याठिकाणचे अतिक्रमण हटवण्याची मागणी सातत्याने होत होती. आयुक्त सत्यम गांधी यांनी या तक्रारीची दखल घेत अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपायुक्त वैभव साबळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी ही मोहीम राबवली.
सकाळी अकरा वाजता सिव्हिल हॉस्पिटल चौकातून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. प्रारंभीच रिक्षा थांब्यासमोरील पत्र्याचे शेड जमीनदोस्त करण्यात आले. तेथून पुढे रस्त्यावर ठिय्या मारून बसलेल्या विक्रेत्यांसह हातगाड्यांवर कारवाई केली. हे हातगाडे जप्त केले. रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीलगत असणार्या खोक्यांसमोरील अतिक्रमणे हटवण्यात आली. खोकेधारकांनी रस्त्यावरच सिमेंटचे कट्टे बांधल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. जेसीबीच्या साहाय्याने हे कट्टे फोडण्यात आले. दुकाने, खोक्यांसमोरील बेकायदा शेड तोडले. बेकायदेशीर फलकही काढण्यात आले. यावेळी विक्रेते आणि पालिकेचे अधिकारी यांच्यात वादावादी झाली. मात्र अतिक्रमण निर्मूलन विभागाने आक्रमकपणे कारवाई केली. दुपारपर्यंत गारपीर चौकापर्यंतचा रस्ता मोकळा करण्यात आला.
आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार उपायुक्त वैभव साबळे, सहायक आयुक्त सहदेव कावडे, सहायक आयुक्त प्रज्ञा त्रिभुवन, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद, अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक राजू गोंधळे, चालक विक्रम घाडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सिव्हिल हॉस्पिटल चौक ते गारपीर चौकदरम्यान दोन्ही बाजूला असणार्या पत्र्याच्या 15 छपर्या काढण्यात आल्या. 25 दुकाने, खोक्यांसमोरील अतिक्रमित कट्टे तोडण्यात आले. तसेच 3 स्टँडबोर्ड आणि हातगाडे जप्त करण्यात आले. गारपीर चौकातील रस्त्यावर आलेले अतिक्रमणही हटवण्यात आले. सायंकाळी साडेचारपर्यंत ही कारवाई सुरू होती.
सिव्हिल हॉस्पिटलसमोरील रस्ता अतिक्रमणमुक्त करणार आहे, असे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले. दरम्यान, ‘रस्त्यावरील अतिक्रमणाची पाहणी केलेली आहे. पाहणीअंती बाधित क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. उर्वरित अतिक्रमण संबंधितांनी काढून घ्यावे. या परिसरात मंगळवारी, दि. 20 रोजी पुन्हा कारवाई केली जाणार आहे’, असे उपायुक्त वैभव साबळे यांनी सांगितले.