सांगली : येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयावर (सिव्हिल हॉस्पिटल) रुग्णांचा मोठा ताण असून, रुग्णालयाची गरज भागवण्यासाठी ५० नवीन व्हेंटिलेटर्सची मागणी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहे. सध्या रुग्णालयात बालरुग्ण विभागात २० आणि अतिदक्षता विभागात २० असे एकूण ४० व्हेंटिलेटर्स कार्यान्वित आहेत.
सांगलीतील या शासकीय रुग्णालयात कोल्हापूर, सोलापूरसह शेजारच्या कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच खासगी रुग्णालयांतून अत्यवस्थ झालेले रुग्णही येथेच पाठवले जातात. श्वसनाचा गंभीर त्रास असलेले, हृदयविकार, अपघात, मेंदूशी संबंधित आजार किंवा स्वतःहून श्वास घेण्यास असमर्थ असलेल्या गंभीर रुग्णांसाठी वेळेत व्हेंटिलेटरची सुविधा देणे आवश्यक असते. या रुग्णालयात दररोज ७०० हून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात, तर अतिदक्षता विभागातील २४ बेड नेहमी पूर्ण क्षमतेने भरलेले असतात.
सध्या उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर्स पुरेसे वाटत असले तरी, ऐनवेळी आपत्कालीन परिस्थितीत ते कमी पडतात. अशावेळी प्रशासनाला मिरजेतील शासकीय रुग्णालयातून व्हेंटिलेटर्स मागवून घ्यावे लागतात किंवा रुग्णांना मिरजेला हलवावे लागते. या पार्श्वभूमीवर ५० नवीन व्हेंटिलेटर्सची मागणी करण्यात आली असून ही मागणी लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.
कोरोना काळातील व्हेंटिलेटर्स पडले बंद
शासकीय रुग्णालयाला कोरोनाच्या काळात शासनाकडून १०० व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, सततच्या आणि अधिक वापरामुळे ते आता खराब झाले आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी रुग्णालयाला नेहमी सज्ज राहावे लागते. त्यामुळे नवीन ५० व्हेंटिलेटर्स तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.