रुग्णांच्या जिवाशी खेळ..! 
सांगली

Sangli : रुग्णांच्या जिवाशी खेळ..!

सिव्हिल चौक ते शंभरफुटी रस्ता फसला दलदलीत

पुढारी वृत्तसेवा

सांगली : डांबरीकरणाचे पुन्हा डांबरीकरण करण्याचा चमत्कार करणार्‍या महापालिकेला जिथे रस्ता करायचा, तिथे बघायला सवड नाही. सांगली जिल्हा शासकीय रुग्णालयासारखे अत्यंत गर्दीचे, गरजेचे, महत्त्वाचे ठिकाणही चिखलातच अडकले आहे आणि तिथून पुढे शंभरफुटीपर्यंतचा रस्ता महापालिकेच्या मेहेरबानीने चिखलात फसला आहे. महिनोंन् महिने चाललेली या रस्त्यावरची ड्रेनेज खोदाई व हे काम कधी पूर्ण होणार, हे मात्र समजत नाही अशीच जनमानसाची प्रतिक्रिया आहे.

नेहमीच पावसाळा तोंडावर आला की, महापालिका रस्ते खोदाईची कामे कशी काय काढते, असा सवाल सामान्य नागरिकांना पडतो. मात्र या उकराउकरीत नागरिक, वाहनधारकांचे काय हाल होतात, याच्याशी या प्रशासनाचा काडीचा संबंध राहत नाही. अनेक महिन्यांपासून याचा भयंकर अनुभव शासकीय रुग्णालयापासून शंभरफुटीपर्यंत ये-जा करणार्‍या हजारो प्रवाशांना येतो आहे. सांगलीतील गारपीर चौकात गेल्या अनेक महिन्यांपासून ड्रेनेजचे काम सुरू असून ते पूर्ण कधी होणार, याचा पत्ता महापालिकेलाही नाही.

शासकीय रुग्णालय चौकातून गारपीर चौक मार्गे शंभरफुटी रस्त्याला जाणारा हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे. या रस्त्यावर बारोमास गर्दी असलेले शासकीय रुग्णालय आहे. बारोमास आणि चोवीस तास गर्दी असलेला हा रस्ता, पण या रस्त्यावर अगदी सिव्हिलच्या दारातच गेल्या अनेक महिन्यांपासून पावसाच्या पाण्याची तळी साचलेली आहेत. याच रस्त्यावर महत्त्वाची रुग्णालये, औषध दुकाने, हॉटेल्स, टपर्‍या, हातगाडे, फळविक्रेते यांची दुतर्फा गर्दी आहे. शंभरफुटीपर्यंतही अनेक नामांकित रुग्णालयेे आहेत. चोवीस तास गर्दीच्या या रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिकेने ड्रेनेजचा भला दांडगा म्हणजे अगदी विहिरीच्या मापाचा खड्डा खणून ठेवला आहे. गेले अनेक महिने येथे ड्रेनेजचे काम सुरू होते, तोवर अलीकडे चौकात पुन्हा चेंबरमधील पाणी गटारीत सोडायचा उद्योग सुरू केला आहे. रुग्णालये आणि परिसरातील रस्ते विनाअडथळ्याचेच असले पाहिजेत. खोदाईची कामे करायची असतील, तर ती युध्दपातळीवर पूर्ण केली पाहिजेत. अ‍ॅम्ब्युलन्स, शववाहिका, रुग्णसाहित्याची ने-आण यात अडथळा येणे योग्य नाही, असे मत डॉ. अनिल मडके यांनी याबाबत व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT