सांगली

Sangli Rain: सांगली शहरासह जिल्ह्यात वळवाचा दमदार पाऊस

उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा, शेतीला संजीवनी

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : गेल्या अनेक दिवसांपासून असह्य उकाड्याने त्रस्त असलेल्या सांगलीकरांना आणि पाणीटंचाईच्या चिंतेत असलेल्या बळीराजाला शुक्रवारी सायंकाळी वळवाच्या पावसाने मोठा दिलासा दिला. सांगली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत सायंकाळी आठच्या सुमारास मान्सूनपूर्व वळवाचा जोरदार पाऊस झाला. सुमारे अर्धा तास कोसळलेल्या या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

वादळी पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने अनेक भागांतील वीजपुरवठा उशिरापर्यंत खंडित केला होता. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली.

गेल्या तीन वर्षांत सांगलीसह जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्यामुळे धरणे, तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते आणि पाणीटंचाईची फारशी झळ बसली नव्हती. मात्र, यंदा 'एल निनो'च्या प्रभावामुळे पाऊस कमी होण्याची भीती हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असल्याने शेतकरी धास्तावला आहे. त्यातच उन्हाळी पाऊसही न झाल्याने शेतीची कामे रखडली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या या दमदार पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून, हा पाऊस पेरणीपूर्व मशागतीच्या कामांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

यंदा कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने ते केवळ पिण्यासाठी वापरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच कसबे डिग्रज येथील बंधाऱ्यात पाणी उपलब्ध नसल्याने नदीकाठावरील शेतीच्या पाण्याचा उपसा बंद करण्यात आला आहे. अशा गंभीर परिस्थितीत निसर्गाने दिलेल्या या दिलासामुळे शेती पिकांना तात्पुरती संजीवनी मिळाली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांची काहीशी तारांबळ उडाली, मात्र पावसाच्या गारव्याने सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.

जिल्ह्याच्या विविध भागांत शुक्रवारी सायंकाळनंतर मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. मिरज तालुक्यात सुमारे अर्धा तास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर कडेगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. शिराळा तालुका, चांदोली आणि परिसरात जोराचे गार वारे सुटून पावसाळी वातावरण तयार झाले होते. रात्री नऊ वाजेपर्यंत येथे पाऊस सुरू झाला नसला, तरी उष्मा कमी झाल्याने लोकांना मोठा दिलासा मिळाला.

वाळवा तालुक्यात मात्र बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. ईश्वरपूरसह तालुक्यातील सखल भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तासगाव शहरात तुरळक, तर तालुक्याच्या पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. जतच्या पूर्व भागातही वादळासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

खानापूर तालुक्यात विटा आणि परिसरात सायंकाळनंतर हलका ते मध्यम पाऊस झाला. तालुक्यातील नागेवाडी, माहुली व लेंगरे परिसरात सायंकाळी साडेपाचनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. भाळवणी परिसरात हलक्या सरी कोसळल्या, तर खानापूर घाटमाथ्यावरील हिवरे, पळशी व बाणूरगड परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाला. या वातावरणामुळे जिल्ह्यात पावसाळा लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT