नागज : महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी चोरोची (ता. कवठेमहांकाळ) येथे अचानक छापा टाकत चिनी बेदाणा पकडला. वॉशिंग सेंटरवर घातक रसायनांचा वापर करून बेदाण्याला कृत्रिम रंग आणि चमक दिली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भोसे (ता. मिरज) येथील अजित पाटील यांच्या मालकीच्या वॉशिंग सेंटरमधील हा प्रकार असल्याची माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
संघाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट बेदाणा वॉशिंग सेंटरवर पाहणी केली असता संशयास्पद पद्धतीने बेदाण्यावर प्रक्रिया सुरु असल्याचे निदर्शनास आले. संबंधित बेदाणा बाहेरुन आयात करुन त्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. बेदाण्यावर रासायनीक प्रक्रियेमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून स्थानिक बेदाणा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला असून संबंधितांवर तातडीने गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पोलिस अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांकडेही लेखी तक्रारी देण्यात आल्या आहेत. तक्रारीमध्ये बेदाणा आयात करणारे, स्थानिक पातळीवर मदत करणारे, तसेच सांगली, सोलापूर आणि इतर भागात वितरण करणाऱ्या साखळीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधितांच्या बँक खात्यांची चौकशी करून आर्थिक व्यवहार तपासावेत, संशयित बेदाणा जप्त करावा आणि संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणी संघाकडून करण्यात आली आहे.