सांगली : विश्रामबाग चौकातून बालकाला पळवून ते रत्नागिरीतील दाम्पत्यास विकणाऱ्या एकास सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज (वय 43, रा. किल्लाभाग, मिरज) असे त्याचे नाव आहे, तर पसार असणाऱ्या अन्य दोघांच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि विश्रामबाग पोलिस ठाण्याची दोन वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत.
विश्रामबाग पोलिस ठाण्यात फुगे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दाम्पत्याचे एक वर्षाचे बालक तिघांनी दि. 20 रोजी चोरले होते. यानंतर याबाबत बालकाच्या पालकांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तब्बल चार दिवस शोध घेतल्यानंतर या बालक चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले होते. तिघांनी रत्नागिरीतील सावर्डे गावातील दाम्पत्यास हे बालक विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
चौकशीमध्ये तिघांची नावे समोर आली होती. त्यानंतर इनायत गोलंदाज याला मिरजेतून अटक करण्यात आली होती, तर अन्य दोघे अद्याप पसार आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, इनायत गोलंदाज याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस अधिक तपास करीत आहेत.