सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कृष्णात माळी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. माळी यांच्या छातीत चाकू अडकल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना मंगळवार, दि. 27 रोजी रात्री कलानगर येथे घडली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
माळी हे महापालिकेचे ते मुख्य अग्निशमन अधिकारी आहेत. माळी दिवसभर कामावर होते. मंगळवारी सायंकाळी ते मित्रासोबत दुचाकीवरून घरी निघाले होते. यावेळी बायपास रस्त्यावर त्यांनी चहा घेतला. नंतर ते मित्रासह कलानगर येथील घराकडे गेले. यावेळी त्यांच्या घराजवळ दुचाकीवरून आलेले दोन हल्लेखोर दबा धरून बसले होते. माळी हे दुचाकीवरून उतरताच हल्लेखोरांनी चाकूने छातीत उजव्या बाजूला वार केले. वार इतका वर्मी होता की तो चाकू माळी यांच्या छातीत अडकून बसला. माळी यांच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर संशयित हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. माळी यांच्या मित्रांनी तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
आयुक्तांसह अधिकाऱ्यांची धाव
अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर खुनी हल्ल्याची माहिती मिळताच आयुक्त सत्यम गांधी, उपायुक्त स्मृती पाटील , उपायुक्त अश्विनी पाटील यांच्यासह उपअधीक्षक प्रणील गिल्डा, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, अरुण सुगावकर यांच्यासह पोलीस पथकांनी रुग्णालयात धाव घेतली होती. हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप समजू शकले नाही.
तीन महिन्यापूर्वी हल्ला
सुनील माळी यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी अज्ञातांनी काठीने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. ही घटना ताजी असतानाच त्यांच्यावर पुन्हा खुनी हल्ला झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते.
आयुक्त पोलिसांवर खवळले
सुनील माळी यांच्यावर तीन महिन्यापूर्वी झालेल्या हल्ल्याची त्यांनी तक्रार दिली होती. परंतु तक्रार देऊन देखील याची गांभीर्याने दखल का घेतली नाही? असा आयुक्त सत्यम गांधी यांनी रुग्णालयातच पोलिस अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.