सांगली : महानगरपालिका क्षेत्रात चिकन व मटण दुकानांमधून निर्माण होणारा कचरा उघड्यावर आणि रस्त्याकडेला फेकून दिला जात असल्याने शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. याची दखल घेत प्रशासनाने अशा विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत २८२ चिकन-मटण दुकाने आणि ६५ इतर विक्रेत्यांना नोटीस बजावल्या असून, सुमारे ४ हजार २०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
चिकन व मटण वेस्ट उघड्यावर टाकण्यात येत असल्याने त्यावर भटक्या कुत्र्यांची टोळकी जमा होत आहेत. विशेषतः सायंकाळनंतर ही समस्या अधिकच गंभीर बनते. चिकन सेंटर्स, मटण दुकाने आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थांच्या गाड्यांसमोर कुत्र्यांच्या झुंडी रस्त्यावर धावत येत असल्याने वाहनचालक, पादचारी आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होत आहे.
काही ठिकाणी वेस्ट खाण्यासाठी जमलेले कुत्रे अचानक रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांच्या अंगावर धावून जात असल्याने भीतीचे वातावरण आहे. काही भागांत भटक्या कुत्र्यांना उघड्यावर कच्चे मांस किंवा चिकनचे अवशेष खाऊ घालण्याचे प्रकारही सुरू आहेत. यामुळे कुत्र्यांची त्या परिसरात गर्दी राहून त्यांचा वावर वाढला आहे. प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईमुळे अस्वच्छता पसरवणाऱ्या आणि नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.