सांगली महापालिका Pudhari Photo
सांगली

Sangli News : छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची मुदतवाढ अडकली ‌‘प्रस्ताव-खुलाशा‌’त

फेरप्रस्ताव सादर होणार; मुदतवाढ गरजेची

पुढारी वृत्तसेवा

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वापराची मुदतवाढ प्रस्ताव आणि खुलाशात अडकली आहे. यापूर्वी तीनदा प्रस्ताव सादर केला आहे. आता पुन्हा चौथ्यांचा फेरप्रस्ताव सादर होणार आहे. खेळ, खेळाडूंचा विकास आणि सुविधा उपलब्ध करण्यासाठी कराराच्या मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर होणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालून मुदतवाढ देणे गरजेचे आहे.

महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार 1972 मध्ये तत्कालीन नगरपालिकेस 28485 चौ.मी. जागा स्टेडियम बांधण्यासाठी 1 रुपया भाड्याने 50 वर्षे मुदतीसाठी ताब्यात मिळाली होती. त्याची मुदत दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजी संपलेली आहे. सांगली शहरातील खेळाडूंसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हे एकमेव स्टेडियम आहे, की जिथे क्रिकेटसह अन्य मैदानी खेळ खेळले जातात. तत्कालीन नगरपालिका व महापालिकेने टप्प्या-टप्प्याने स्टेडियमचा विकास केला आहे. प्रेक्षक गॅलरीचे बांधकाम केले आहे. टर्फ विकेट तयार केली आहे. दरम्यान, 2021 मध्ये स्टेडियम विकासासाठी डीपीसीतून 3.20 कोटींचा निधी उपलब्ध झाला होता, मात्र पुढे कराराची मुदतवाढ संपल्याने हा निधी खर्च होऊ शकला नाही. त्यामुळे स्टेडियम वापरण्यास महापालिकेला आणखी 50 वर्षे मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळोवेळी दिलेला आहे. मात्र प्रत्येकवेळी काही मुद्द्यांवर खुलासा मागवला जातो.

नुकतेच महापौर धीरज सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी मैनाक घोष यांची भेट घेऊन मुदतवाढीची मागणी केलेली आहे. मात्र नुकतेच अप्पर तहसीलदार यांच्याकडील एक पत्र महापालिकेच्या मालमत्ता विभागाला प्राप्त झाले आहे. करार शर्तभंग, संबंधित जागेवरील बांधकामाची कब्जेहक्काने विक्री, गाळे भाड्याने दिले असल्यास भाडे उत्पन्नाचा 50 टक्के हिस्सा शासनाला जमा केला आहे का, याअनुषंगाने अप्पर तहसीलदार यांनी महापालिकेकडून खुलासा, त्रुटींची पूर्तता करून फेरप्रस्ताव मागवला आहे. दरम्यान, यापूर्वीही असे खुलासे मागवले होते. त्यावर शर्तभंग झालेला नाही. बांधकामाची कब्जेहक्काने विक्री झालेली नाही. तसेच गाळे भाड्याने दिलेले नाहीत. नगरपालिका असताना स्वातंत्र्यसैनिक समितीला शासन मान्यतेने गाळा दिलेला आहे. त्यांच्याकडून भाडे घेतले जात नसल्याचे यापूर्वी खुलाशात म्हटले होते. आता तसाच खुलासा पुन्हा सादर होणार, असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT