सांगली : येथील वर्दळीच्या राम मंदिर चौकात शनिवारी पहाटे काही कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा विनापरवाना उभारल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकारामुळे पहाटेच्या सुमारास परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिस आणि महापालिका प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेतल्याने अनर्थ टळला.
शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास शिवतेज सावंत, आदित्य नाईक, आशिष खिचडे, अमित पाटील, सुजल कांबळे, राहुल माने, ऋषिकेश भोई यांच्यासह सुमारे 60 ते 70 तरुणांच्या गटाने राम मंदिर चौकात एकत्रित येत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला. शहरात पहाटेच्यावेळी गस्त घालणाऱ्या गुड मॉर्निंग पथकाच्या निदर्शनास ही बाब आली.
याबाबतची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे उपअधीक्षक संदीप भागवत, निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विनापरवाना पुतळा बसवला गेल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सांगली शहर पोलिस ठाणे आणि मुख्यालयातील दंगल नियंत्रण पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा झाली. सुरुवातीला काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रशासनाने कार्यकर्त्यांना नियमांची जाणीव करून दिली आणि चर्चेतून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. अखेर सकारात्मक चर्चेनंतर कार्यकर्त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली. सकाळी संबंधित कार्यकर्त्यांनी स्वतःहून पुतळा त्या ठिकाणाहून बाजूला घेतला. पोलिसांनी पुतळा सन्मानाने ताब्यात घेतल्यानंतर परिसरातील वातावरण निवळले.