कोकरूड : येळापूरपैकी चव्हाणवाडी (ता. शिराळा) येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर शेडगेवाडी-कराड राज्यमार्गावर मंगळवारी रात्री बिबट्या उघडपणे वावरताना दिसल्याने संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येळापूरपैकी चव्हाणवाडी येथील रहिवासी आर्यन खांडेकर यांच्या जनावरांच्या शेडमध्ये मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने अचानक झडप घालून एका मांजराची शिकार केली. या घटनेमुळे परिसरात आधीच घबराट पसरली होती. त्यानंतर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कराड-शेडगेवाडी राज्यमार्गावर असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर बिबट्या बिनधास्तपणे रस्त्यावरून फिरताना स्थानिक युवकांच्या निदर्शनास आला.