चरण : परिसरातील काही घटकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आरळा (ता. शिराळा) येथील काही मुस्लिम कुटुंबांनी संसाराच्या साहित्यासह गाव सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला. ही कुटुंबे पायी चालत कोल्हापूर येथे न्यायालयासमोर धरणे आंदोलन करण्यासाठी निघाली होती. मात्र, ते चरण येथे पोहोचले असता प्रशासनाने त्यांची वाट अडवून सकारात्मक चर्चा केली. प्रशासनाने मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर या कुटुंबांनी आंदोलन मागे घेतले आणि ते पुन्हा आरळा गावाकडे रवाना झाले.
आरळा गावातील पीडित मुस्लिम कुटुंबांनी रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास साहित्यासह गाव सोडले. पायी चालत दुपारी बारा वाजता ही कुटुंबे चरण येथे पोहोचली. ही माहिती मिळताच शासकीय यंत्रणा तातडीने हलली. ईश्वरपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, पोलिस उपविभागीय अधिकारी अरुण पाटील, शिराळा तहसीलदार श्यामला खोत, कोकरूड पोलिस ठाण्याचे सा. पोलिस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी तातडीने चरण येथे धाव घेऊन आंदोलनकर्त्या कुटुंबांची भेट घेतली. या वेळी सुमारे चार तास मॅरेथॉन चर्चा सुरू होती.
अखेर प्रशासनाकडून आंदोलकांना लेखी स्वरूपात आश्वासन पत्र देण्यात आले. या पत्रात नमूद केले आहे की, पीडितांच्या तक्रारी व चौकशीबाबतचा सविस्तर प्रस्ताव पुढील आठ दिवसांत वरिष्ठांकडे पाठवला जाईल. तसेच गुन्हा रजिस्टर नंबर ३० मधील तपास अधिकारी बदलण्यात येतील. आरळा गावात पोलिस चौकी सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. याशिवाय, दाखल गुन्ह्यातील कलमे बदलण्याबाबत संपूर्ण तपासणी केली जाईल आणि जामीन झालेल्या आरोपींवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई केली जाईल.