Chandoli Dam 
सांगली

Sangli News : चांदोली भरले, चिंता मिटली..!

पाण्याचा प्रश्न सुटला; वारणा नदीत १६०० क्युसेकने विसर्ग सुरू

पुढारी वृत्तसेवा

वारणावती : वारणा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे वारणा प्रकल्पांतर्गत असलेले चांदोली धरण शनिवार, दि. २९ रोजी दुपारी चार वाजता १०० टक्के म्हणजेच पूर्ण क्षमतेने भरले. यामुळे वारणा खोऱ्यातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, यंदाच्या खरीप-रब्बी हंगामासह आगामी वर्षभरातील शेती व पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.

३४.४० टीएमसी क्षमतेच्या चांदोली धरणाची पाण्याची पातळी सध्या ६२६.९० मीटरवर पोहोचली आहे. धरणात एकूण ३४.४० टीएमसी (९७४.१९ दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा २७.५२ टीएमसी (७७९.३५ दशलक्ष घनमीटर) झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत उपयुक्त पाणीसाठा २५.९८ टीएमसी अर्थात ९४.४१ टक्के होता.

धरणाच्या पाण्यावर सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील अनेक भागातील शेती तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. शिराळा, वाळवा, सांगली, मिरज, म्हैसाळ यांसह विविध भागांना या जलाशयातील पाण्याचा मोठा आधार आहे. तसेच चांदोली व सोनवडे येथील जलविद्युत प्रकल्पांमधून वीजनिर्मिती केली जाते.

धरण १०० टक्के भरल्यामुळे आता पडणारा अतिरिक्त पाऊस नदीपात्रात सोडावा लागणार आहे. सध्या वीजनिर्मिती गृहातून वारणा नदीपात्रात १६०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. चांदोली धरण गतवर्षी ३० सप्टेंबर रोजी शंभर टक्के भरले होते. यंदा पाऊस कमी झाला असला तरी एक महिना आधी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

गतवर्षी २९३१ मिलिमीटर पाऊस पडल्यानंतर धरण १०० टक्के भरले होते. यंदा २०९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर धरण १०० टक्के भरले आहे. ३४.४० टीएमसी क्षमता असणाऱ्या या धरणातील पाण्याचा उपयोग सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी होतो. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे सरासरी प्रमाण तीन हजार ते पाच हजार मिलिमीटर इतके आहे २०१५ चा अपवाद वगळला दरवर्षी हे धरण १०० टक्के भरले आहे. धरण १०० टक्के भरल्यामुळे आगामी वर्षभराचा पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT