chandoli dam Power Generation
चांदोलीत वीजनिर्मिती सुरू झाली आहे. 
सांगली

सांगली : चांदोलीत वीजनिर्मिती सुरू; पावसाने धरण 60 टक्के भरले

पुढारी वृत्तसेवा
आष्पाक आत्तार

वारणावती : चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर मंदावला आहे. गेल्या 24 तासात केवळ दोन मिलिमीटर पाऊस पडला आहे. मात्र गेल्या चार दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी जवळपास चार मीटरने वाढली आहे. त्यामुळे बंद असणारी वीजनिर्मिती आता पुन्हा सुरू झाली आहे. धरणाची पाणी पातळी खालावल्यामुळे गेल्या महिनाभरापासून येथील वीजनिर्मिती बंद होती. सध्या धरणात 20.62 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे बंद असणारी वीजनिर्मिती आज सुरू झाली असून एक जनित्र सुरू झाले आहे. येथून 1650 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.

चांदोली येथे धरणाच्या पाण्यावर चांदोली जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे. येथे आठ मेगावॅट क्षमतेची दोन जनित्रे आहेत. येथून सोळा मेगावॅट वीजनिर्मिती होते. गतवर्षी पाच वर्षातील उच्चांकी वीजनिर्मिती येथे झाली होती. धरणाची पाणी पातळी खालावल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून ही वीजनिर्मिती बंद होती. आजपासून ती पुन्हा सुरू झाली आहे. धरणात सध्या 59.92 टक्के पाणीसाठा झाला आहे, तर धरणाची पाणीपातळी 611.10 मीटरवर पोहोचली आहे. आजअखेर 1183 मिलिमीटर पाऊस येथे पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा अधिक पाऊस आहे. धरणातील पाणीसाठा समाधानकारक आहे.

दरम्यान, आज धरणाची पाणी पातळी 611.10 मीटरवर पोहोचली आहे. धरणात 9 हजार 220 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी चार दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले आहे. ठिकठिकाणी भाताची रोपलावण सुरू आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. डोंगररांगा हिरव्यागार झाल्या आहेत. छोटे-मोठे धबधबे कोसळू लागले आहेत.

SCROLL FOR NEXT