सांगली

सांगली चेंबर ऑफ कॉमर्स निवडणूक : सत्ताधारी गटाला ८ तर विरोधी गटाला ५ जागा

मोहन कारंडे

सांगली, पुढारी वृत्तसेवा : सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मोठ्या चुरशीने मतदान झाले. सायंकाळी सुरू झालेल्या मतमोजणीत रात्री उशिरा तिसऱ्या फेरी अखेर सत्ताधारी व्यापारी एकता पॅनेलचे ७ उमेदवार आघाडीवर होते तर विरोधी व्यापारी विकास आघाडीचे ६ उमेदवार आघाडीवर होते. रात्री दीड वाजता अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यात सत्ताधारी गटाला आठ तर विरोधी गटाला पाच जागा मिळाल्याचे जाहीर करण्यात आले.

सांगली चेंबर ऑफ कॉमर्सची यंदा प्रथमच सत्ताधारी व्यापारी एकता पॅनेल व व्यापारी विकास आघाडीत जोरदार चुरशीने लढत झाली. सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे ३६१ सभासद आहेत. त्यातील ३५५ सभासदांनी मतदान केले. सत्ताधारी व्यापारी एकता पॅनेलचे नेतृत्व विद्यमान अध्यक्ष शरद शहा यांनी तर विरोधी व्यापारी एकता पॅनेलचे नेतृत्व माजी अध्यक्ष अशोक पाटील यांनी केले.

सांगली बाजार समितीच्या वसंतदादा पाटील सभागृहात सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत चुरशीने मतदान झाले. सकाळी आठ वाजल्यापासूनच मतदानासाठी व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडले. सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे उमेदवार सातत्याने सभासदांशी संपर्कात होते. सायंकाळी चार वाजल्यानंतर चेंबरच्या कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. रात्री पावणेसात वाजता १०० मतांच्या पहिल्या फेरीत विरोधी व्यापार विकास आघाडीचे आठ तर सत्ताधारी गटाचे पाच उमेदवार आघाडीवर होते. दुसरी फेरी रात्री दहा वाजता जाहीर करण्यात आली. त्यात सत्ताधारी गटाचे आठ उमेदवार आघाडीवर होते तर विरोधी पॅनलचे पाच उमेदवार आघाडीवर होते.
रात्री साडेअकरा वाजता तिसरी फेरी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सत्ताधारी गटाचे ७ तर विरोधी गटाचे ६ उमेदवार आघाडीवर होते. बाकी ५५ मतांची मोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. एक दोन मताच्या फरकाने उमेदवार मागे पुढे होत होते. त्यामुळे काय निकाल लागणार याची धाकधूक उमेदवारासह व्यापाऱ्यांनाही लागलेली दिसून येत होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रमणिक दावडा यांनी काम पाहिले.

दरम्यान, बाजार समितीसाठी निवडून आलेले चेंबरचे एक संचालक दोन्ही गटाकडे तर चेंबरच्या विरोधात निवडून आलेले एक संचालक विरोधी गटाकडे होते.

चेंबर ऑफ कॉमर्स नामांकित संस्थेची निवडणूक बहुतांश वेळा बिनविरोध झाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधात तरुण, ज्येष्ठ व्यापाऱ्यांमध्ये असंतोष होता. हा असंतोष सांगली बाजार समितीच्या निवडणुकीतही व्यापाऱ्यांनी मतपेटीतून व्यक्त केला होता.

सत्ताधारी व्यापारी एकताचे विजयी उमेदवार व मिळालेली मते

शरद शहा- 207, अभय मगदूम-192, हरिष पाटील-188, समीर साखरे- 188, अमर देसाई- 184, अण्णासो पाटील-184, दीपक चौगुले -182, सचिन घेवारे- 177

विरोधी व्यापारी विकास आघाडीचे विजयी उमेदवार व मते

सत्यनारायण अट्टल – 208, रोहित आरवाडे – 229, विकास मोहिते – 129, गोपाल मर्दा – २१२, अशोक पाटील – 206

SCROLL FOR NEXT