स्वप्निल पाटील
मिरज : यंदाच्या गणेशोत्सवात एक बेस एक टॉपलाच पोलिसांनी परवानगी दिली आहे. परंतु कार्यकर्त्यांच्या मनासारखा गणेशोत्सव साजरा केला जाईल, असे आश्वासन मिरजेतील सर्वच नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. काही मंडळे दोन बेस दोन टॉप, तर काही जण चार बेस चार टॉप लावण्याच्या तयारीत आहेत. मग पोलिसांच्या भूमिकेचे काय होणार? मिरवणुकीत पुन्हा पोलिस आणि मंडळांचे कार्यकर्ते यांच्यात वाद पेटणार का? नेमके कोणाच्या भूमिकेनुसार गणेशोत्सव साजरा होणार? याकडे आता सार्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
पुण्यातून सुरू झालेला डीजेचा वाद संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे. तसाच तो मिरजेतही आहेच. यावर्षी पोलिसांनी एक बेस एक टॉपच्या वर डीजे वाजूच द्यायचा नाही असा चंग बांधला आहे. पण याला कितपत यश येणार याबाबत मात्र पश्नचिन्ह आहे. डीजेला कायमस्वरुपी बंदी आली पाहिजे, अशी काही जणांची मागणी आहे, तर त्याला काही जणांचा प्रखरपणे विरोध आहे.
मिरजेत यंदा पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात राजकीय नेत्यांची भूमिका असल्याचे दिसून येते. बालगंधर्व येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या मनासारखा गणेशोत्सव साजरा करण्याचे आश्वासन सर्वच नेत्यांनी दिले आहे. मग नेमके मिरजेतील विसर्जन मिरवणुकीत किती बेस किती टॉप लागणार? हे पाहावे लागणार आहे.
पोलिस म्हणतात, नियमांची पायमल्ली केल्यास जागेवर डीजे साऊंड सिस्टिम जप्त करणार अशी भूमिका आहे. मग या वर्षी मिरवणुकीत एक बेस एक टॉपच्या वर डीजे सिस्टिम लावल्यास पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद उफाळून येणार का? गेल्या वर्षी एका वरिष्ठ अधिकार्याने चमकोगिरी केल्यानंतर मिरवणूकच काही वेळ रेंंगाळली होती. यावर्षी तर सर्वच अधिकारी नवे आहेत. त्यामुळे मिरवणूक सुरळीत पार पडणार की नवे काही पाहावयास मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
एक तासानंतर पाच मिनिटांची विश्रांती गरजेची
गेल्या वर्षी एका तास डीजे वाजविल्यानंतर पाच मिनिटांचा ब्रेक घेण्यात आला होता. विजर्सन मिरवणुकीत लहान मुलांसह अबाल-वृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झालेले असतात. त्यांना त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक तासातील ५५ मिनिटे वादन आणि ५ मिनिटे सर्व साउंड सिस्टिम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो यावर्षीही घेतल्यास भाविकांना वाद्यांच्या दणदणाटातून थोडा दिलासा मिळू शकतो.
सायरन, रिव्हर्सवर नियंत्रण येणार
काही मंडळांकडून एक बेस एक टॉप लावला जाईल, पण त्या साऊंड सिस्टिमवर सायरन आणि रिव्हर्स साऊंड वाजवले जाते. त्यामुळे गाण्यापेक्षा याचा त्रास भाविकांना मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे सायरन आणि रिव्हर्स साऊंड वाजविणार्यांवरही या वर्षी कारवाई होणार का?
साऊंड सिस्टिमवर निर्बंध...पारंपरिक वाद्यांचे दर वधारणार?
प्रत्येक वर्षी साऊंड सिस्टिमवर निर्बंधाची चर्चा सुरू झाल्यानंतर पारंपारिक वाद्यांचे मात्र दर वाढवले जातात. याचा फटका गणेशोत्सव मंडळांना बसतो. साऊंड सिस्टिमवर निर्बंध आणण्याची चर्चा करण्यासाठी अनेकजण पुढे येतात, पण पारंपरिक वाद्यांचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोण पुढे का येत नाहीत? अशीही भूमिका काही गणेशोत्सव मंडळांची असल्याचे दिसून येते.
काहीही होऊदे, वाजवायचंच... काही मंडळांची भूमिका
एक बेस एक टॉपच्या वर साऊंड सिस्टिम लावल्यास पोलिसांकडून जप्त करण्यात येणार आहे. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला तरी चालेल किंवा साऊंड सिस्टिम जप्त केली तरी चालेल, पण वाजवाचंच, या भूमिकेत मिरजेतील काही मंडळे असल्याचे दिसून येते.