सांगली : शहरातील शामरावनगर येथे कानाखाली मारल्याच्या कारणातून चैतन्य आप्पासाहेब तांदळे याचा चौघांनी धारदार हत्यारांनी भोसकून आणि डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून खून केला होता. याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली. सुजल उर्फ पाप्या चंद्रकांत वाघमोडे आणि शुभम चंद्रकांत वाघमोडे (दोघे रा. शामरावनगर, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी विनोद मुकुंद डांगे याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे, तर एकजण अद्याप पसार आहे.
सुजल उर्फ पाप्या वाघमाडे हा दि. 9 रोजी शामरावनगर येथे त्याचा मामा विनोद डांगे याच्यासमवेत थांबला होता. त्यावेळी चैतन्य तांदळे हा त्या ठिकाणी मित्राकडे गेला होता. त्यावेळी चैतन्य याने सुजल उर्फ पाप्या याला त्याच्याजवळ बोलावून घेतले. त्यावेळी त्याच्याकडे हत्यार असल्याचे चैतन्यच्या निदर्शनास आले. त्याने ‘काय रेे हत्यार घेऊन फिरतोस का?’ असे म्हणून त्याला कानाखाली मारली होती. त्यानंतर सुजल उर्फ पाप्या आणि विनोद डांगे हे दोघे त्या ठिकाणाहून निघून गेले. काही वेळाने ते शुभम वाघमोडे आणि राहुल जाधव या दोघांना घेऊन पुन्हा त्या ठिकाणी आले. यावेळी पाठलाग करून चौघांनी चैतन्य तांदळे याचा धारदार हत्यारांनी वार करून व डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून खून केला. चैतन्य याच्या मानेत मारलेला चाकू तसाच अडकून राहिला होता.
या खूनप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी तातडीने विनोद डांगे याला अटक केली होती, मात्र अन्य तिघे हल्लेखोर पसार होते. मुख्य सूत्रधार सुजल उर्फ पाप्या आणि शुभम हे दोघे जुना बुधगाव रस्ता ते शिंदेमळा रस्त्यावर थांबल्याची माहिती सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण पथकातील संदीप पाटील व गौतम कांबळे यांना मिळाली होती. त्यानुसार दोघांनी तातडीने घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांना पाहताच दोघांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पाटील व कांबळे यांनी पाठलाग करून त्यांना अटक केली. या खून प्रकरणातील राहुल जाधव मात्र अद्याप पसार असून पथके त्याच्या मागावर असल्याचे पोलिसांनी सांगितले.