कुंडल : समाजमाध्यमांवर ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल खोटे व्हिडीओ प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी दुधोंडी (ता. पलूस) येथील एका तरुणाविरुद्ध कुंडल पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर संभाजी निकम (वय २८, रा. दुधोंडी) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सरपंच उषा रमेश देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ नोव्हेंबर रोजी दुपारी दुधोंडी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उषा देशमुख असताना उपसरपंच विजय जाधव यांनी सुधीर निकम याने समाजमाध्यमांवर पोस्ट केलेला व्हिडीओ दाखवला. ग्रामपंचायतीत अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार होत असल्याचा दावा करणारा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामसह 'दुधोंडी ग्रुप' या व्हॉट्स ॲप ग्रुपवर प्रसारित करण्यात आला होता.
कोणतीही खातरजमा न करता काल्पनिक व चुकीची माहिती समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याने ग्रामपंचायतीविषयी संभ्रम निर्माण होऊन गावात तणावाचे वातावरण तयार झाले, असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५६(१) अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हवालदार विशाल चंद करत आहेत.